मुंबई
Trending

सिंधुदुर्गात महायुतीत ठिणगी: कुडाळच्या 6 भाजप नगरसेवकांचे निलंबन, निलेश राणे आक्रमक!

Nilesh Rane : जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या निर्णयाला निलेश राणेंनी केराची टोपली; ‘नारायण राणे सांगतील तेव्हाच निलंबन मान्य करू’

सिंधुदुर्ग :- सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. कुडाळ नगरपंचायतीमधील भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावर निवडून आलेल्या आठपैकी सहा नगरसेवकांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी हा निर्णय घेतला असला, तरी शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे.

निलंबनाचे कारण आणि राणेंची प्रतिक्रिया

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन या निलंबनाची माहिती दिली आहे. नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर आणि चांदणी कांबळी या सहा नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या नगरसेवकांवर भाजपच्या कार्यक्रमांना गैरहजर राहणे आणि शिवसेनेच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

यावर आमदार निलेश राणे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून आपला संताप व्यक्त केला. “भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी माझ्या मतदारसंघातल्या सहा नगरसेवकांचे निलंबन केले आहे. आम्हाला ज्या दिवशी खासदार नारायण राणे सांगतील, त्या दिवशीच हे निलंबन मान्य करू,” असे त्यांनी स्पष्ट केले. “सिंधुदुर्गात भाजपचे निर्णय खासदार नारायण राणे घेत असतात, त्यामुळे आम्ही या पत्राला किंमत देत नाही,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.महायुतीतील धुसफुस
गेल्या काही महिन्यांपासून तळकोकणात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात धुसफूस सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेशावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला होता. आता पुन्हा एकदा नगरसेवकांच्या निलंबनामुळे हा वाद विकोपाला गेला आहे.

प्रभाकर सावंत यांनी पत्रात म्हटले आहे की, निलंबित केलेले नगरसेवक पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होत नाहीत, पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात सार्वजनिक विधाने करतात आणि इतर पक्षांच्या सभासद नोंदणी कार्यक्रमांना हजेरी लावतात. या वर्तनामुळे पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसत असून, पक्षहित बाधित होत आहे, असे सावंत यांनी नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0