
Solapur Latest Political Update :,“दोन पाऊल मागे हटलो, पण मोठी झेप घेण्यासाठीच!” पराभवाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी प्रणिती शिंदेंचे प्रेरक पत्र; धनशक्ती आणि सत्तेच्या दुरुपयोगावर ओढले ताशेरे
सोलापूर l काँग्रेसचा अभेद्य गड मानल्या जाणाऱ्या सोलापुरात यंदा भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक मुसंडी मारत महापालिकेत आपली एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. 102 जागांच्या सोलापूर महानगरपालिकेत भाजपाने 63 जागा जिंकत बहुमताचा आकडा सहज पार केला आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत एमआयएमने 8 जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरत सर्वांनाच धक्का दिला आहे. दुसरीकडे, भाजपाला रोखण्यासाठी एकत्र आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि माकप यांसारख्या दिग्गज पक्षांच्या आघाडीला सोलापूरकरांनी नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.
या दारुण पराभवानंतर खचलेल्या कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी एका पत्राद्वारे भावनिक साद घातली आहे. “हा पराभव वेदनादायक आहे, पण तो अंतिम नाही,” असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला. बलाढ्य धनशक्ती, सत्तेचा दुरुपयोग आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या जोरावर ही निवडणूक लढवली गेली असली, तरी आपण शेवटच्या क्षणापर्यंत संघर्षाची साथ सोडली नाही, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. राजकीय जीवनात जय-पराजय हे येत-जात असतात, मात्र कार्यकर्त्यांची निष्ठा हीच पक्षाची खरी शिदोरी असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले.
पराभवाचे आत्मपरीक्षण करतानाच, “झुकना हमारी फितरत नहीं, दो कदम पीछे हटे हैं पर सिर्फ अगली छलांग लगाने के लिए!” अशा शेरशायरीच्या अंदाजात प्रणिती शिंदे यांनी उद्याच्या लढाईसाठी सज्ज होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. लोकांच्या अपेक्षा आणि बदलतं सामाजिक वास्तव समजून घेऊन पुन्हा एकदा सोलापूरच्या हितासाठी मैदानात उतरण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. भाजपाच्या विजयाने आणि काँग्रेसच्या पीछेहाटीने सोलापूरच्या राजकारणात आता मोठ्या बदलांचे संकेत मिळत असून, आगामी काळात ही राजकीय समीकरणे कोणत्या दिशेला वळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



