सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील सरिता खानचंदानी यांची आत्महत्या; उल्हासनगर हादरले

•Sarita Khanchandani Suicide News इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवली; मृत्यूचे कारण अस्पष्ट
उल्हासनगर :- जलप्रदूषण, ध्वनीप्रदूषण आणि इतर सामाजिक समस्यांविरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या ‘हिराली फाउंडेशन’च्या प्रमुख आणि वकील सरिता खानचंदानी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी कॅम्प-4 परिसरातील एका सात मजली इमारतीवरून उडी मारून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.त्यांच्यासारख्या लढवय्या महिलेने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे गूढ कायम आहे.
गुरुवारी दुपारी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘रोमा अपार्टमेंट’ इमारतीवरून सरिता खानचंदानी यांनी उडी घेतली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, त्या आपल्या कार्यालयातून थेट इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेल्या आणि काही क्षण टेरेसवर बसून प्रार्थना करत असतानाच त्यांनी अचानक खाली उडी मारली. काही नागरिकांनी हा धक्कादायक प्रसंग मोबाईलमध्ये कैद केला.
उपचारादरम्यान मृत्यू
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना इतर रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान संध्याकाळी त्यांचा मृत्यू झाला, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सरिता खानचंदानी यांनी वालधुनी नदीतील प्रदूषण, धार्मिक उत्सवांमधील ध्वनीप्रदूषण, कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट दुचाकी आणि बेकायदेशीर होर्डिंग्ज यांसारख्या अनेक सामाजिक प्रश्नांवर न्यायालयीन लढा दिला होता. वकिली व्यवसायासोबतच त्यांनी अनेक सामाजिक कार्यांत सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे, अशा धाडसी आणि सामाजिक भान असलेल्या महिलेने आत्महत्येसारखे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
पोलिसांनी या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून केली असून, तपास सुरू आहे. गुरुवारी त्यांचा कोणासोबत वाद झाला होता का किंवा आत्महत्येमागे आणखी काही कारण आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की, सर्व शक्यतांचा तपास केला जात आहे.



