
Smirti Mandana Weeding Photos : ढोल-ताशांच्या गजरात नवरदेवाचे स्वागत; मानधना फार्म हाऊसवर जोरदार तयारी!
Smriti Mandana : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि सांगलीची कन्या स्मृती मानधना लवकरच तिच्या जीवनातील एका नव्या इनिंगची सुरुवात करणार आहे. स्मृती आणि संगीतकार पालाश मुच्छल यांचा बहुप्रतिक्षित विवाह सोहळा येत्या रविवारी सांगलीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. मानधना यांच्या सांगलीतील फार्म हाऊसवर विवाह सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून, संपूर्ण परिसर रोषणाईने नटला आहे. स्मृतीच्या चाहत्यांमध्ये या विवाह सोहळ्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.



हळदीच्या कार्यक्रमात महिला खेळाडूंचा ‘संगीतमय’ ठेका
विवाह सोहळ्यापूर्वी झालेल्या हळदीच्या कार्यक्रमाला भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनी हजेरी लावली. स्मृतीच्या आनंदात सहभागी झालेल्या या खेळाडूंनी हळदीच्या कार्यक्रमावेळी मनसोक्त ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. महिला खेळाडूंच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. स्मृतीच्या घरी सध्या क्रिकेट आणि संगीताचा सुरेख संगम पाहायला मिळत आहे. या खास क्षणांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाले आहेत.
नवरदेव पालाश मुच्छलची ‘दमदार’ एन्ट्री
हळदीच्या कार्यक्रमासाठी स्मृतीचा होणारा पती, प्रसिद्ध संगीतकार पालाश मुच्छल याची एन्ट्री देखील लक्षवेधी ठरली. पालाशचे आगमन ढोल-ताशांच्या निनादात आणि जल्लोषात झाले. ढोल-ताशांच्या गजरात त्याचे या ठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. संगीत आणि क्रिकेट क्षेत्रातील या दोन प्रतिभावान व्यक्तींच्या विवाहामुळे, दोन्ही क्षेत्रातील अनेक दिग्गज या सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता आहे.


