Uncategorized

Shrirang Barne : शिंदे खासदाराची दिल्लीत वर्णी, महत्त्वाची जबाबदारी

Shrirang Barne News : खासदार बारणे यांची केंद्रीय ऊर्जा विभागाच्या स्थायी समिती अध्यक्षपदी निवड तथा केंद्रीय राजभाषा समितीच्या संयोजकपदाचीही जबाबदारी खासदार बारणे यांच्याकडेच

चिंचवड :- केंद्र सरकारच्या ऊर्जा विभागाच्या स्थायी समिती अध्यक्षपदी खासदार श्रीरंग बारणे Shrirang Barne यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर केंद्रीय राजभाषा समितीच्या संयोजकपदाची जबाबदारीदेखील त्यांच्याकडेच सोपविण्यात आली आहे. मावळ लोकसभा क्षेत्रातून श्रीरंग बारणे हे लोकसभेच्या निवडणुकीत विजय झाले होते. यापूर्वी त्यांना संसद रत्न देण्यात आले होते.

खासदार बारणे हे तिसर्‍यांदा लोकसभेवर निवडून गेले आहेत. गेल्या दहा वर्षात त्यांना केंद्र शासनाच्या विविध समित्यांवर काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. यावेळीही दोन महत्त्वाच्या पदांवर बारणे यांची निवड झाल्याने विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लोकसभेची ऊर्जा विभागाची स्थायी समिती विद्युत मंत्रालय आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अनुदान संबंधी मागण्यांवर विचार करते. ही समिती देशभरातील ऊर्जा संबंधी अहवाल तयार करते. संसदेच्या सभागृहांना अशक्य असलेली कामे ही समिती करते. एखाद्या प्रकरणाची चौकशी करणे, साक्षीदारांची चौकशी आणि सूचनांचा विचार करून तर्कसंगत निष्कर्ष काढणे हे या समितीचे कार्य आहे.

विद्युत मंत्रालय आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय यांच्यात प्रशासकीय नियंत्रण ठेऊन सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि संस्थांवर या समितीकडून निगराणी ठेवणे हे या समितीचे मुख्य कार्य आहे. विद्युत विषयक विधेयक संसदेत सादर केल्यानंतर ते विधेयक या समितीकडे विचारविनिमयासाठी पाठवले जाते. त्यावर विचार करून योग्य सूचना ही समिती करते. संसदेने पाठवलेल्या विधेयकांवर ही समिती सूक्ष्मपणे चौकशी करते आणि जनतेकडून त्याबाबत सूचना मागवते.  विद्युत धोरणांची समीक्षा, पवन ऊर्जेचे मूल्यांकन, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून अनुदान मागणीशी संबंधित अहवाल समिती संसदेत सादर करते. या महत्वाच्या केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदी खासदार श्रीरंग बारणे यांची निवड झाली आहे.

संसदीय राजभाषा समितीचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत. या समितीचे काम देशभर हिंदी भाषा व राज्यावर स्थानिक भाषा यांचा प्रसार करणे आहे. केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या कामकाजात भाषेचा वापर होतो की नाही त्याचे निरीक्षण करणारी राजभाषा समिती ही एकमेव समिती आहे. ही समिती आपला अहवाल संसदेत सादर न करता थेट राष्ट्रपतींकडे सादर करते. त्यामुळे संसदीय राजभाषा समितीचे महत्त्व अधिक आहे. या समितीच्या संयोजकपदी खासदार श्रीरंग बारणे यांची निवड झाली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभेत विजयाची हॅट्रिक केली आहे. त्यांच्या संसदेतील कामगिरीची दखल घेत त्यांना संसदरत्न, संसद महारत्न म्हणून गौरविण्यात आले आहे. मागील दहा वर्षांपासून ते संसदेत सक्रियपणे सर्व चर्चांमध्ये सहभाग घेतात. त्यांच्या संसदेतील अनुभवाचा फायदा घेण्याचा दृष्टीने त्यांची दोन्ही समित्यांवर निवड करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0