Shrikant Shinde News : पत्राचाळचे आरोपीच पत्र लिहायला लागलेत…. खासदार श्रीकांत शिंदे
•ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊत यांच्या पत्रानंतर श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
कल्याण :- पत्राचाळचे आरोपीच पत्र लिहायला लागलेत. त्यांचा मोदींवरील विश्वास वाढलेला दिसतोय असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. तसेच पत्रेके घर में रहने वाले दुसरे को पत्र लिखा नहीं करते असे रोखठोक प्रत्युत्तर देखील त्यांनी दिले आहे. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यावरच श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
राऊतांच्या तोंडून शिव्याशापा शिवाय काही येत नाही प्रसार माध्यमांशी बोलतांना श्रीकांत शिंदे यांनी राऊतांवर जहरी टीका केली आहे. ते म्हणाले, “मला त्या पत्रावर हसावे का रडावे हेच कळत नाहीये. पत्राचाळ घोटाळ्यातील आरोपी आता पत्र लिहायला लागले आहेत. त्या पत्रामध्ये वैद्यकीय सेवा कशा प्रकारे केली जाते, कोणा कोणाला मदत करण्याचे काम फाउंडेशनच्या माध्यमातून केले जाते याबाबत इत्यंभूत माहिती त्यांनी ठेवलेली आहे. त्यांच्या तोंडून शिव्याशापा शिवाय दुसरं काही येत नाही. मात्र आज त्यांनी एखाद्या फाउंडेशनसाठी चांगल्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यासाठी त्यांचा धन्यवाद व्यक्त करत”, असा खोचक टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे.
श्रीकांत शिंदे म्हणाले, “राऊतांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते पत्र लिहिले आहे. म्हणजे त्यांचा मोदींवरील विश्वास वाढलेला दिसतोय. जे पत्राचाळचे आरोपी आहेत त्यासाठी तुरुंगात जाऊन आलेत ते अशा प्रकारचे आरोप करतात याचा विचार जनतेने करावा. मीडिया आणि जनतेने या आरोपांना गांभीर्याने घेऊ नये”, असेही श्रीकांत शिंदे म्हणाले.आरटीआयमुळे आता कोणतीच गोष्टी लपून राहत नाही. आम्ही त्या फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांना मदत करतो. आज धर्मदाय आयुक्तांकडे गेल्यावर या सर्व गोष्टी समजतात. राऊतांना एवढीच खाज असेल तर त्यांनी सर्व माहिती शोधून काढावी. पत्रात त्यांनी लिहिलेला तपशील हा मोगम आहे. त्यांचे आता काहीच राहिले नाही त्यामुळे असे बिन बुडाचे आरोप करण्याचे काम सुरू आहे”, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.