Shrikant Shinde : मला केंद्रात मंत्री पदाची संधी… उपमुख्यमंत्री पदाबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांची भूमिका स्पष्ट!
Shrikant Shinde On DCM : उपमुख्यमंत्री पदाच्या बातम्यांना खासदार श्रीकांत शिंदे यांचा पूर्णविराम!
मुंबई :- महायुती सरकारकडे बहुमत असतानाही महायुतीचे सरकार स्थापन करण्याकरिता लागणारा विलंब आणि त्यामुळे राजकीय चर्चेला आलेले उधाण यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदावरून राज्यभरात वेगवेगळ्या तर्क-वितरकाचे धागे बांधले जात आहे. मुख्यमंत्री आणि महायुतीच्या मंत्रिमंडळाबाबत वाढत चाललेला सस्पेन्स आणि त्यामुळे होत असलेली चर्चा यातूनच राज्यात चलबिचलची परिस्थिती ओढवली आहे. दोन दिवसांपासून सर्व वृत्तवाहिनीवर महायुतीचे गणित ठरले असून खासदार श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांना उपमुख्यमंत्री पदाची वर्णी लागू शकते आणि एकनाथ शिंदे यांना केंद्रात मंत्री पद मिळणार असल्याच्या चर्चा त्यामुळे राज्यात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत आपल्याला केंद्रातही मंत्री पदाची ऑफर होती.परंतु पक्ष संघटनेकरिता काम करण्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे ज्या काही बातम्या पसरत आहे.त्या केवळ अफवा असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी काय पोस्ट केली?
महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे.
माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा…