Bhiwandi Accident : भरधाव ट्रकची धडक… दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू!

•मुंबई-नाशिक महामार्गावर हृदयद्रावक अपघात,दोघेही लहानपणापासूनचे मित्र
भिवंडी | मुंबई-नाशिक महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन १९ वर्षीय मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याने भिवंडीतील गैबीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ट्रकने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे ही दुर्घटना घडली.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे असद अलताफ अक्रम अन्सारी (19 वय) आणि नेहाल सईद अहमद अन्सारी (19 वय) अशी आहेत. दोघेही लहानपणापासूनचे जिवलग मित्र होते व गैबीनगर भागात राहत होते. अपघाताच्या वेळी ते दोघे दुचाकीवरून महामार्गावरून जात होते. बॉम्बे ढाबासमोरील हायवे दिवा येथे त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने मागून जबर धडक दिली.
धडकेनंतर दोघे रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या पोटावर व छातीवर जबर मार लागून गंभीर दुखापतीमुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, उपस्थित लोकांनी क्षणभर स्तब्धता अनुभवली. अपघाताची माहिती मिळताच गैबीनगरमध्ये शोककळा पसरली असून, मित्र व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेप्रकरणी असद अन्सारीच्या भावाच्या मित्र युशा खान यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, ट्रकचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक होळकर करत आहेत.


