क्राईम न्यूजपुणे
Trending

शिवशाही अत्याचार प्रकरण: पुणे पोलिसांचे भक्कम ‘तांत्रिक’ जाळे; गुगल सर्च हिस्टरी आणि डीएनए रिपोर्टने आरोपी गाडेची कोंडी

Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील आवाजाची तांत्रिक पडताळणी | आरोपीचा डीएनएही जुळला

पुणे | स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणाचा तपास करताना पुणे पोलिसांनी तपासाचे नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. आरोपी दत्ता गाडे याला गुन्ह्याच्या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी केवळ प्रत्यक्षदर्शींवर अवलंबून न राहता, सायबर आणि वैज्ञानिक पुराव्यांची मोठी शिदोरी आरोपपत्रासोबत जोडली आहे.

गुगल सर्च हिस्टरी आणि सायबर पुरावे

आरोपी गाडेचा मोबाइल अद्याप सापडलेला नसला तरी, पोलिसांनी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने त्याच्या मोबाइल नंबरवरून त्याची ‘गुगल सर्च हिस्टरी’ शोधून काढली. यामध्ये आरोपी वारंवार अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पोलिसांनी या हिस्टरीचा रीतसर पंचनामा केला असून, आरोपीची गुन्हेगारी मानसिकता सिद्ध करण्यासाठी हा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

ध्वनी तीव्रता पडताळणी (Acoustic Test)
या गुन्ह्यात पोलिसांनी प्रथमच ‘तुलनात्मक ध्वनी तीव्रता पडताळणी’ पंचनामा केला आहे. शिवशाही बस ही वातानुकूलित (AC) आणि बंदिस्त असल्याने, आतून ओरडण्याचा आवाज बाहेर येतो का? याची तपासणी ध्वनी तंत्रज्ञांमार्फत करण्यात आली. या पडताळणीत बसमधून आवाज बाहेर येत नसल्याचे स्पष्ट झाले, ज्यामुळे पीडितेचा आवाज कोणापर्यंत का पोहोचला नाही, याचे तांत्रिक उत्तर पोलिसांना मिळाले आहे.

डीएनए आणि फॉरेन्सिक पुरावे
डीएनए जुळला: बसमध्ये सापडलेले केस आणि आरोपीचे नमुने यांचा डीएनए रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, ज्यामुळे आरोपीचा गुन्ह्यातील प्रत्यक्ष सहभाग वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाला आहे.

कपड्यांचे पुरावे: झटापटीत तुटलेले शर्टाचे बटन पोलिसांना बसमध्ये सापडले होते. पोलिसांनी आरोपीने गुन्हा करताना घातलेला शर्टही जप्त केला असून, तो या पुराव्यांशी मिळताजुळता आहे.

सीसीटीव्ही आणि ओळख परेड

स्वारगेट स्थानकातील सीसीटीव्हीमध्ये आरोपीची उपस्थिती स्पष्ट झाली आहे. तसेच, ओळख परेडमध्ये पीडित तरुणीने आरोपी गाडेला अचूक ओळखले आहे.

चालक-वाहकांचे जबाब

पोलिसांनी एसटी महामंडळाच्या चालक आणि वाहकांकडे आरोपीबाबत माहिती मागवली होती. पोलिसांनी अनेक चालक-वाहकांचे शोध घेऊन त्यांचे जबाब न्यायालयात नोंदवले आहेत. यासोबतच कॅबचालक, रिक्षाचालक आणि वैद्यकीय अहवाल यांचाही समावेश आरोपपत्रात करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0