Shivsena Symbol : शिवसेना पक्ष-चिन्ह वाद: सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीची शक्यता धूसर; न्यायमूर्तींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे पेच!

•दुपारी 1 नंतर ‘अरवली डोंगररांगा’ प्रकरणाची विशेष सुनावणी;शिवसेनेच्या याचिकेचा क्रमांक 37 वा असल्याने निकालाकडे डोळे लावून बसलेल्या महाराष्ट्राची प्रतीक्षा वाढणार?
मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष-चिन्हाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नियोजित आहे. मात्र, न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या विशेष खंडपीठाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आज यावर सविस्तर युक्तिवाद होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.
वेळेचा पेच आणि विशेष सुनावणी
आजच्या कार्यक्रमानुसार, न्यायमूर्ती सूर्यकांत हे दुपारी 1 वाजेपर्यंतच नियमित कामकाज पाहणार आहेत. त्यानंतर ते न्यायमूर्ती जोयमाला बागची यांच्यासह ‘अरवली डोंगररांगा’ संदर्भातील एका महत्त्वाच्या प्रकरणाची विशेष सुनावणी घेणार आहेत. शिवसेनेच्या याचिकेचा क्रमांक दैनंदिन कार्यसूचीत 37 वा असल्याने, 1 वाजेपर्यंत या क्रमांकापर्यंत सुनावणी पोहोचणे कठीण मानले जात आहे.
ॲड. असीम सरोदे यांचे मत
ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “न्यायालयाने गेल्या तारखेला या प्रकरणावर सविस्तर सुनावणी घेण्याचे संकेत दिले होते. मात्र, आजच्या मर्यादित वेळेमुळे आणि याचिकेच्या क्रमामुळे प्रत्यक्ष सुनावणी होईलच याची खात्री देता येत नाही. जर आज सुनावणी सुरू झाली नाही, तर ती उद्या (22 जानेवारी) घेतली जाऊ शकते.”


