मुंबईठाणे

Shivsena Shinde Group : शिवसेनेच्या (शिंदे गट) संघटनात्मक रचनेत मोठा बदल!

Suhas kande Nashik Shivsena Leader Appointed : ‘प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख’ हे नवे पद निर्माण; आमदार सुहास कांदे यांची नाशिक जिल्ह्याच्या प्रमुखपदी नियुक्ती

मुंबई :- शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) संघटनात्मक रचनेत पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde Shivsena यांच्या आदेशानुसार एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. नांदगावचे आमदार सुहास कांदे Suhas Kande यांची ‘प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख, नाशिक जिल्हा’ या नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख’ हे पद निर्माण झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

पद निर्मितीचा उद्देश

हे नवे पद सर्व जिल्हा प्रमुखांच्या वरच्या स्तरावर असेल आणि पक्षाच्या जिल्हास्तरीय संघटन कामकाजाचे प्रभावीपणे समन्वय साधण्याची जबाबदारी यावर राहील.

आगामी नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका लक्षात घेऊन पक्ष संघटनेला अधिक बळकट करणे, प्रभावी निवडणूक रणनीती आखणे आणि जिल्हास्तरीय कार्यपद्धती एकसंध करणे हा या पदनिर्मितीमागील प्रमुख उद्देश आहे. नाशिकसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्याची जबाबदारी लोकप्रिय आमदार सुहास कांदे यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.

मुंबईत नियुक्तीची घोषणा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, भाऊसाहेब चौधरी, राम रेपाळे यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. आगामी निवडणुका लक्षात घेता, नाशिक जिल्ह्यातील विविध विधानसभा आणि तालुका स्तरावरील शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्याही लवकरच निश्चित केल्या जाणार आहेत.

‘ही पदवी नव्हे, सन्मान’: सुहास कांदे

या जबाबदारीबद्दल बोलताना आमदार सुहास कांदे यांनी भावना व्यक्त केली. “शिवसेनेच्या प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख या जबाबदारीसाठी माझी निवड केल्याबद्दल मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानतो,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “ही नियुक्ती केवळ एक पद नाही, तर प्रत्येक शिवसैनिकाच्या निष्ठा आणि त्यागाचा सन्मान आहे. नाशिक जिल्हा हा शिवसेनेचा गड आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तळागाळातील प्रत्येक शिवसैनिकाशी थेट संपर्क ठेवणार आहोत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भगवा झेंडा पुन्हा एकदा उंच फडकवू. शिवसेना ही सत्ता नव्हे, तर सेवा आहे आणि सेवा हीच माझी खरी ओळख राहील,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0