मुंबई
Trending

Rohit Pawar : रोहित पवारांचा ‘6 हजार कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा’ आरोप; संबंधित कंपनीच्या मालकाला दारू घोटाळ्यात अटक!

ambulance scams in health department of maharashtra : ‘सुमित फॅसिलिटीज’ कंपनीने प्रकरण दाबण्यासाठी ‘किती खोके’ दिले, याची कागदपत्रांसह माहिती देणार – रोहित पवार

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेत 6 हजार कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घोटाळ्यात संबंधित असलेल्या ‘सुमित फॅसिलिटीज’ नावाच्या कंपनीच्या मालकाला झारखंडमध्ये दारू घोटाळ्यात अटक करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे, ज्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) सोशल मीडिया हँडलवरून या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, या प्रकरणावर आपण वारंवार आवाज उठवूनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. आता ते ‘सुमित फॅसिलिटीज’ कंपनीने हे प्रकरण दाबण्यासाठी कोणा-कोणाला आणि किती ‘खोके’ दिले, याचा हिशोब कागदपत्रांसह महाराष्ट्रासमोर मांडणार असल्याचा इशारा दिला आहे.

काय आहे नेमका आरोप?

रोहित पवार यांच्या ‘एक्स’ पोस्टनुसार, “महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेतील सर्वात मोठा घोटाळा असलेल्या 6000 कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्यातील सुमित फॅसिलिटीजच्या मालकाला झारखंडमध्ये दारू घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे.”
ते पुढे म्हणाले, “झारखंडमध्ये मनुष्यबळ पुरवठा करण्याचे काम या कंपनीकडे होते. महाराष्ट्रातदेखील 33 लाखांची अ‍ॅम्ब्युलन्स 86 लाखांना विकत घेऊन 6000 कोटींपेक्षा अधिकच्या दलाली प्रकरणात सुमित कंपनी सहभागी आहे.”

या गंभीर आरोपानंतर, रोहित पवार यांनी राज्य सरकारला रुग्णवाहिका निविदा प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी, असे आवाहन केले आहे. “हेच शासनासाठी योग्य राहील,” असेही ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार सरकारवर आक्रमकपणे टीका करत आहेत. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान आणि त्यानंतरही त्यांनी सरकार आणि मंत्र्यांवर विविध आरोप केले होते. विशेष म्हणजे, अधिवेशनानंतर त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे सभागृहात कथितपणे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर विरोधकांसह सत्ताधारी पक्षातूनही टीका झाली असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0