मुंबई

Shinde Thackeray Dasara Melva : शिवतीर्थावर ‘रणशिंग’! ठाकरे-शिंदे गटाचे आज दोन स्वतंत्र दसरा मेळावे, भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट होणार

Shinde Thackeray Dasara Melva Update : सायंकाळी 7 वाजता शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन; मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ‘मनसे’ युतीवर लक्ष ; सायंकाळी 6 वाजता गोरेगाव नेस्को मैदानावर एकनाथ शिंदे यांचा मेळावा; शेतकऱ्यांची मदत आणि महायुतीचा भगवा फडकवण्यावर भर

मुंबई :- विजयादशमीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र आज मुंबईत असेल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि सत्ताधारी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या दोन्ही गटांकडून आज दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांच्या माध्यमातून दोन्ही पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकतील, असे मानले जात आहे. Mumbai Dasara Melva Update

शिवतीर्थावर ठाकरे गटाचा मेळावा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा आज सायंकाळी 7 वाजता शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) होणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्यात शिवसैनिकांचा आत्मविश्वास दुणावण्याचा प्रयत्न करतील.

ठाकरे आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्यातील महायुती सरकारवर जोरदार ताशेरे ओढण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ही ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई असल्याने, या निवडणुकीच्या रणनीतीवर आणि पक्षाच्या भावी वाटचालीवर त्यांचे अधिक लक्ष असेल.

मनसे युतीवर सस्पेन्स

या मेळाव्यात राजकीय वर्तुळाला सर्वाधिक उत्सुकता आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीच्या घोषणेची. मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही बंधू एकत्र आल्याने, या आघाडीविषयी उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून बरेच काही स्पष्ट करण्याची शक्यता आहे. तसेच, मनसेसोबत युती झाल्यास महाविकास आघाडीचे (MVA) भवितव्य काय असेल, या प्रश्नाचे उत्तरही या मेळाव्यातून मिळण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाचा नेस्को मैदानावर मेळावा

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शिवसेनेचा दसरा मेळावा सायंकाळी 6 वाजता गोरेगाव येथील नेस्को मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे आपल्या भाषणात प्रामुख्याने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने, विशेषतः शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेल्या मदतीचा आढावा घेतील. तसेच, मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यावर त्यांचा जोर असेल. गेल्या काही दिवसांत शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या हल्ल्यांच्या मालिकेत आजच्या मेळाव्यात अधिक भर पडण्याची दाट शक्यता आहे.

vivek

Recent Posts