ठाणे

धनुष्यबाण सोडून शितल देवरुखकर यांनी हाती घेतले ‘कमळ’; आदित्य ठाकरेंना नववर्षाचा पहिला मोठा झटका!

Yuva Sena member Sheetal Devrukhkar-Sheth joins BJP : मुंंबईच्या राजकारणात खळबळ: 20 वर्षांची साथ सुटली; ‘मातोश्री’वरून संवादाचे दरवाजे बंद झाल्याने उपनेत्याचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

मुंबई | राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा महासंग्राम सुरू असतानाच, शिवसेना (UBT) गटाला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत मोठा धक्का बसला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्ती, पक्षाच्या उपनेत्या आणि मुंबई विद्यापीठ अधिसभेच्या रणरागिणी शितल देवरुखकर-शेट यांनी गुरुवारी अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. गेल्या दोन दशकांपासून शिवसेनेच्या बांधणीत सक्रिय असलेल्या शितल यांच्या जाण्याने ठाकरे गटाच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

‘जागावाटप’ आणि ‘संवादहीनते’चा बसला फटका

शितल देवरुखकर या प्रभाग क्रमांक 51 मधून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज होत्या. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला सोडण्यात आला. आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना त्यांनी वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, मात्र ‘मातोश्री’वरून किंवा पक्षाच्या कोअर कमिटीकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. “20 वर्षे रक्ताचे पाणी करून काम केल्यानंतरही जर पक्षप्रमुख साधे बोलायला तयार नसतील, तर तिथे स्वाभिमान उरत नाही,” अशी जळजळीत प्रतिक्रिया देत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

सिनेटमधील ‘आवाज’ आता भाजपसाठी घुमणार

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेत (Senate) आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली युवा सेनेने 10 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या, त्यात शितल देवरुखकर यांचा सिंहाचा वाटा होता. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने रान उठवणाऱ्या शितल यांच्याकडे अभ्यासू नेतृत्व म्हणून पाहिले जाते. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे केवळ प्रभाग 51 च नव्हे, तर उत्तर मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये भाजपची ताकद वाढणार आहे.

भाजपमध्ये जंगी स्वागत आणि मोठी जबाबदारी

उल्हासनगर येथे पार पडलेल्या या ऐतिहासिक पक्षप्रवेशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांचे स्वागत केले. भाजपने शितल यांची क्षमता ओळखून त्यांना तातडीने ‘भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष’ हे महत्त्वाचे पद बहाल केले आहे. यामुळे आगामी निवडणुकीत भाजप महिलांच्या प्रश्नांवर अधिक आक्रमकपणे ठाकरे गटाला घेरण्याची शक्यता आहे.

vivek

Recent Posts