Sharad Pawar : शरद पवार यांना ‘रुबी हॉल’मधून डिस्चार्ज; प्रकृती स्थिर, पुढचे काही दिवस मुंबईत घेणार विश्रांती

Sharad Pawar Health Update : थकव्यामुळे चार दिवसांपासून पुण्यात होते उपचार | ‘सिल्व्हर ओक’वर भेटीगाठी मर्यादित राहणार | विठ्ठल मणियार यांनी दिली माहिती
पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आज सकाळी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. आता त्यांचे सर्व वैद्यकीय अहवाल समाधानकारक असून ते मुंबईतील आपल्या निवासस्थानी रवाना झाले आहेत.
वैद्यकीय चाचण्यांचे रिपोर्ट समाधानकारक
सततचे दौरे आणि सभांच्या धावपळीमुळे आलेल्या थकव्यामुळे शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या चार दिवसांत त्यांच्या विविध आरोग्य चाचण्या करण्यात आल्या. “साहेबांची प्रकृती आता उत्तम असून सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे,” अशी माहिती त्यांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
पुढील मुक्काम मुंबईत; डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला
रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर शरद पवार
पुण्यातून थेट मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या आपल्या निवासस्थानी जाणार आहेत. डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे. कामाच्या व्यापामुळे प्रकृतीवर ताण येऊ नये, यासाठी आगामी काही दिवस त्यांच्या सार्वजनिक भेटीगाठी आणि दौरे मर्यादित राहण्याची शक्यता आहे.
“कामातच त्यांची खरी विश्रांती”
विठ्ठल मणियार यांनी पवारांच्या जिद्दीचे कौतुक करताना म्हटले की, “साहेबांचा स्वभाव असा आहे की त्यांना कामातच खरी विश्रांती मिळते. रिकामे बसणे त्यांना आवडत नाही, पण प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेता यावेळी त्यांना विश्रांती घेणे अनिवार्य आहे.” डिस्चार्ज घेताना शरद पवार यांनी रुबी हॉलमधील डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाचे आभार मानले.



