
Sharad Pawar Group On Pipani Symbol : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून ‘पिपाणी’ चिन्ह बाद; लोकसभा, विधानसभेत झालेले मतविभाजन थांबणार
मुंबई :- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह मिळाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला ‘पिपाणी’ (ट्रम्पेट) या साधर्म्य असणाऱ्या चिन्हामुळे मोठा फटका बसला होता. पिपाणीला मिळालेल्या हजारो मतांमुळे आपले उमेदवार पराभूत झाले, असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. अखेर, निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या मागणीची दखल घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुक्त चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ हे चिन्ह वगळले आहे, ज्यामुळे शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
लोकसभा निवडणुकीत पिपाणीला हजारांपासून लाखांपर्यंत मते मिळाली, तर विधानसभा निवडणुकीत या चिन्हामुळे आपले 9 उमेदवार पराभूत झाले, असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता. पिपाणी चिन्ह वगळल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुतारी आणि पिपाणीमुळे होणारा मतदारांचा गोंधळ टळण्याची शक्यता आहे. पिपाणी या चिन्हाला निवडणूक चिन्हांच्या यादीत ‘तुतारी’ असे साधर्म्य नाव असल्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होत होता, ज्यामुळे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला मिळणारी मते अपक्ष उमेदवारांना मिळत होती.
शिरूर, बारामती, सातारा, भिवंडी, दिंडशेरी, रावेर, अहिल्यानगर, बीड या मतदारसंघांमध्ये पिपाणीला मोठी पसंती मिळाली होती. तसेच अनेक मतदारसंघांत शरद पवारांच्या उमेदवारांपेक्षा पिपाणी चिन्हाच्या अपक्षांना अधिक मते मिळाल्याने, ही मते विभाजित झाली नसती तर त्यांचे 19 आमदार निवडून आले असते, असा दावा करण्यात आला होता.
निवडणूक आयोगाने आपल्या 194 मुक्त चिन्हांच्या यादीतून पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वगळले आहे.



