Sharad Pawar : राष्ट्रीय नेते शरद पवार यांचा बंड
•राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय आयुष्यातील बंड
मुंबई :- गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला. पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले.त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटींदरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना अनेकवेळी मार्गदर्शन केले. वयाच्या 24 व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले
शरद पवार वयाच्या 29 व्या वर्षी 1967 च्या राज्य विधानसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून विजयी झाले.वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश वयाच्या 29व्या वर्षी झालं. 1972 आणि 1978 सालच्या निवडणुकीतही ते विजयी झाले. इ.स. 1978 सालच्या निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुखमंत्री झाले. यशवंतराव चव्हाणांबरोबरच वसंतदादा पाटील हेसुद्धा पवारांचे मार्गदर्शक होते. पण काँग्रेस पक्षाचे 12 आमदार फोडून पवारांनी विरोधी पक्षाबरोबर हातमिळवणी केली आणि वसंतदादांचे सरकार पाडले. त्यानंतर ‘पवारांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला’ अशी जळजळीत प्रतिक्रिया वसंतरावांनी दिली.
18 जुलै 1978 रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवारांबरोबर काँग्रेस (इंदिरा) पक्षातून बाहेर पडलेले 12 आमदार, भारतीय काँग्रेस (समाजवादी) पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले.ते राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते. 1980 साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. जून 1980 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेस(इंदिरा) पक्षाने 280 पैकी 186 जागा जिंकल्या आणि बँरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते.
1984 सालची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली आणि ते लोकसभेवर निवडून गेले. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत विरोधी पक्ष राज्यातील 48 पैकी केवळ 5 जागा जिंकू शकले. त्यात पवारांच्या बारामती या जागेचा समावेश होता .मात्र त्यांनी राष्ट्रीय राजकारणात न पडता काही काळ राज्याच्या राजकारणातच राहायचे ठरवले. मार्च 1985 ची राज्य विधानसभा निवडणूक त्यांनी बारामतीतून जिंकली आणि लोकसभा सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला. त्या विधानसभा निवडणुकीत पवारांच्या काँग्रेस(स) पक्षाने 288 पैकी 54 जागा जिंकल्या आणि पवार राज्यविधानसभेतील विरोधी पक्षनेते झाले.
1987 साली 9 वर्षांच्या खंडानंतर शरद पवारांनी राजीव गांधींच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे काँग्रेस(इंदिरा) पक्षात परत प्रवेश केला. जून 1988 मध्ये पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केन्द्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून समावेश केला. 26 जून 1988 रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यापूर्वीच्या काळात राज्यात काँग्रेस पक्षाला फारसे आव्हान नव्हते. पण बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष भारतीय जनता पक्षाशी युती करून काँग्रेस पक्षाच्या अनेक वर्षे अबाधित असलेल्या वर्चस्वाला आव्हान देऊ लागला होता. त्या आव्हानाला तोंड देऊन राज्यात काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम राखण्याची जबाबदारी पवारांवर आली.नोव्हेंबर 1989 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राज्यातील 48 पैकी 28 जागा जिंकल्या. पक्षाची राजस्थान,मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांत झाली तशी वाताहत महाराष्ट्रात झाली नाही. पण 1984 च्या तुलनेत पक्षाने 15 जागा कमी जिंकल्या. शिवसेनेने 4 जागा जिंकून प्रथमच लोकसभेत प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाने 10 जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली. लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीमुळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला. राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी 1990 मध्ये निवडणुका होणार होत्या.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रचारसभा घेऊन काँग्रेस पक्षापुढे मोठे आव्हान उभे केले. राज्य विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 288 पैकी 141 तर शिवसेना-भाजप युतीने 94 जागा जिंकल्या. राज्याची स्थापना झाल्यानंतर प्रथमच काँग्रेस पक्षाने विधानसभेतील बहुमत गमावले. तरीही 12 अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर शरद पवार यांनी 4 मार्च 1990 रोजी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली.
जानेवारी 1991 मध्ये विलासराव देशमुख, सुरूपसिंग नाईक आणि इतर काही मंत्र्यांनी शरद पवारांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी पक्षाध्यक्ष राजीव गांधी यांच्याकडे केली. पण त्याला राजीव गांधींनी नकार दिला.
1991 च्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी काँग्रेस पक्षाचा राज्यात एकहाती प्रचार केला. पक्षाने राज्यात 48 पैकी 38 जागा जिंकल्या आणि 1989 च्या निवडणुकीत झालेल्या पिछेहाटीची काही अंशी भरपाई केली. निवडणुक प्रचारादरम्यान राजीव गांधींची हत्या झाली. पी.व्ही.नरसिंह राव आणि अर्जुनसिंग यांच्याबरोबर पवारांचे नावही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे अशा बातम्या वर्तमानपत्रांत आल्या. मात्र काँग्रेस संसदीय पक्षाने पी.व्ही.नरसिंह राव यांना नेतेपदी निवडले आणि त्यांचा 21 जून 1991 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.
राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी-मार्च 1995 मध्ये निवडणुका होणार होत्या. त्या निवडणुकींच्या तिकिटवाटपात काँग्रेस पक्षात मोठया प्रमाणावर बंडखोरी झाली. अनेक ठिकाणी काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध अपक्ष म्हणून निवडणुला लढवल्या.
जनतेत सरकारविरुद्ध वाढलेली नाराजी आणि मोठया प्रमाणावर झालेली बंडखोरी यांचे प्रतिबिंब मतपेटीत उमटले. काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला.शिवसेना-भाजप युतीस 288 पैकी 138 जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास 80 जागांवर समाधान मानावे लागले.राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांचा 14 मार्च 1995 रोजी शपथविधी झाला.