मुंबई

Sharad Pawar News : शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक! जयंत पाटील यांचा राजीनामा, शशिकांत शिंदेंना नेतृत्वाची गदा

Sharad Pawar News : जयंत पाटील ‘मदमुक्त’, शशिकांत शिंदे ‘पवारविश्वासू’ ते प्रदेशाध्यक्ष

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)मध्ये नेतृत्वबदलाच्या नाट्यमय घडामोडी शनिवारी उघडकीस आल्या. सात वर्षांपासून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले जयंत पाटील Jayant Patil यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी ‘पवारांचे गड सर करणारे सेनापती’ शशिकांत शिंदे यांची वर्णी लागली आहे.ही निवड केवळ बदलाची नसून, पक्षाला नव्या संघर्षासाठी सज्ज करण्याची तयारी असल्याचे संकेतच यातून मिळतात.

“मी मदमुक्त व्हावं हीच विनंती!” — जयंत पाटील यांचा टोकाचा निर्णय

राष्ट्रवादीच्या 10 जूनच्या वर्धापनदिनी जयंत पाटील यांनी राजकीय संकेत दिले होते. “सात वर्षं सेवा केली, आता नव्या पिढीला संधी देण्याची वेळ आहे. हा पक्ष पवार साहेबांचा आहे, निर्णय त्यांचाच असावा,” असं म्हणत त्यांनी राजीनाम्याची पूर्वसूचना दिली होती.आज त्यांच्या विधानाला वास्तवाचा आधार मिळाला.

जयंत पाटील यांचा कार्यकाळ संघर्षांनी भरलेला होता. 2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपकडून सुरु असलेल्या गळतीला थोपवणं, आघाडीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणं, तर अजित पवारांच्या बंडखोरीनंतर पक्षाला पुन्हा उभारी देणं — हे सर्व त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलं.

माथाडी चळवळीपासून राजकीय गड सर करणारा ‘पवारांचा सोल्जर’

शशिकांत शिंदे यांचा प्रवास अनोखा आहे. एकीकडे ते कामगार चळवळीतील खंदे नेतृत्व, तर दुसरीकडे पवारांची राजकीय योजना राबवणारे मूकमार्गदर्शक.

1999 मध्ये जावळीच्या गडावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणं असो, की शालिनीताई पाटलांसारख्या भक्कम विरोधकांशी थेट लढणं — शिंदे प्रत्येक वेळेस पवारांच्या बाजूने उभे राहिले.
कोरेगावात त्यांना पराभवाचा स्वाद चाखावा लागला, तरीही पवारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून विधान परिषदेत संधी दिली.

आज तीच निष्ठा पक्षाच्या ‘प्रदेशाध्यक्ष’ पदाच्या रूपात त्यांच्या हाती आली आहे. 15 जुलैला ते अधिकृतपणे जयंत पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.

vivek

Recent Posts