मुंबईठाणे
Trending

Sharad Pawar : ‘धर्मेंद्र म्हणजे सर्वसामान्य माणसांचे पडद्यावरील प्रतिनिधित्व!’

Sharad Pawar On Dharmendra : शरद पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे वाहिली आदरांजली; म्हणाले, ‘शोले’मधील ‘वीरू’ आजही घनिष्ठ मैत्रीचं प्रतीक म्हणून अधिराज्य गाजवतो!

मुंबई :- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र Actor Dharmendra यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. ‘शरद पवार’ यांनी धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीचा आणि त्यांच्या ‘वीरू’ या भूमिकेचा खास उल्लेख करत, राजकीय आंदोलनांमध्येही त्यांच्या चित्रपटातील प्रसंगाचा उल्लेख कसा होतो, हे नमूद केले आहे. Dharmendra passes away

शरद पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की,

“1960 च्या दशकात भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण करून चित्रपटात सर्वसामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कथानकांमधून उठावदार भूमिका साकारणारे आणि भारतीय प्रेक्षकांची मनं जिंकून सिनेजगतात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.”

त्यांनी धर्मेंद्र यांच्या लोकप्रियतेचा आढावा घेताना पुढे नमूद केले, “आताच्या तरुणाईला कल्पना नसेल पण एक पिढी त्यांच्या लकबीची, त्यांच्या केशभूषेची, वेशभूषेची चाहती होती. ‘शोले’मध्ये त्यांनी साकारलेला ‘वीरू’ आजही घनिष्ठ मैत्रीचं प्रतीक आणि तडफदार नायक म्हणून भारतीय रसिकमनांवर अधिराज्य गाजवतो आहे.”

राजकारणातील ‘वीरू’चा प्रसंग
पवार यांनी धर्मेंद्र यांच्या ‘शोले’ चित्रपटातील एका खुमासदार प्रसंगाची आठवण करून दिली. ते म्हणाले, “अनेक वेळा ‘शोले’मधील त्यांचा पाण्याच्या टाकीवरील खुमासदार प्रसंग आजही आमच्या राजकीय क्षेत्रात उत्साही कार्यकर्ते आंदोलन म्हणून अंगिकारतात.”

पवारांनी ‘धरम वीर’, ‘चुपके चुपके’, ‘सत्यकाम’, ‘अनुपमा’, ‘मेरा गाँव मेरा देश’ आणि ‘ड्रीम गर्ल’ यांसारख्या जवळपास 250 सुप्रसिद्ध कलाकृतींचा उल्लेख करत, “धर्मेंद्र ह्यांनी साकारलेल्या भूमिका कायम स्मरणात राहतील,” असे म्हटले आहे.

शेवटी, “सिनेसृष्टीच्या ‘धरम पाजीं’ना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व देओल कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो,” असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0