IAS Officers Transfer List : राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा ‘सिलसिला’ सुरूच; सात अधिकाऱ्यांची बदली

• तुकाराम मुंढे यांच्या रिक्त जागी सुशील खोडवेकर; भंडारा जिल्हाधिकाऱ्यांचीही बदली
मुंबई: राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा वेग कायम असून, राज्य सरकारने पुन्हा एकदा सात अधिकाऱ्यांची बदली केली आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या असंघटित कामगार विकास आयुक्तपदी आता सुशील खोडवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अशोक करंजकर यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, मुंबईचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, संजय कोलते यांची भंडारा जिल्हाधिकारी पदावरून मुंबईतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली आहे. या रिक्त जागी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांची वर्णी लागली आहे.
कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?
1.डॉ. अशोक करंजकर: उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, मुंबईचे सदस्य सचिव.
2.संजय कोलते: शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक.
3.सुशील खोडवेकर: विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई.
4.सावन कुमार: जिल्हाधिकारी, भंडारा.
5.नमन गोयल: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार.
6.डॉ. जी.व्ही.एस. पवनदत्त: सहायक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक.
7.लघिमा तिवारी: सहायक जिल्हाधिकारी, गोंडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर.
या बदल्यांमध्ये तरुण अधिकाऱ्यांनाही नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यातच तुकाराम मुंढे यांच्यासह पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या आणि आता पुन्हा ही नवीन यादी जाहीर झाली आहे. या बदल्यांमुळे प्रशासनात मोठी फेरबदल दिसून येत आहे.


