Shani Shingnapur News: शनिशिंगणापूर देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांची आत्महत्या!

Shani Shingnapur News: राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले; आत्महत्येचे कारण अस्पष्ट
Shani Shingnapur News: शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज (सोमवार, 28 जुलै) सकाळी शेटे यांनी त्यांच्या राहत्या घरी छताला गळफास लावून जीवन संपवले. या घटनेमुळे शनिशिंगणापूर परिसरात आणि देवस्थानच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
शनिशिंगणापूर परिसरात आणि देवस्थान वर्तुळात मोठी खळबळ; पोलीस तपास सुरू
शेटे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नितीन शेटे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
माजी विश्वस्त आणि देवस्थानच्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीने आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. शेटे यांच्या या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


