Shambhuraj Desai in Assembly Session : वांद्रेच्या 42 एकर जमिनीच्या वादावरून विधानसभा गोंधळली!

Shambhuraj Desai in Assembly Session : शंभूराज देसाईंच्या विधानाने वातावरण तापले; ठाकरे गटाचे आमदार आक्रमक
मुंबई : वांद्रेतील 42 एकर जमीन आणि झोपडपट्टी पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून राज्य विधानसभेत मंगळवारी प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी या विषयावर लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली.
या मुद्द्यावर बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी “2019 ते 2022 दरम्यान तत्कालीन सरकारने केंद्र सरकारला एकही पत्र पाठवलेले नाही,” असा आरोप केला. यावरून विरोधकांनी आक्षेप घेत सभागृहात गोंधळ केला. देसाई पुढे म्हणाले, “आम्ही 2022 नंतर चार वेळा पत्र पाठवली आहेत. आम्ही काही चूक केली नाही. तुम्हाला मिरची का झोंबली?”
बीजेपी आमदार अतुल भातखळकर यांनी धारावी पुनर्विकासासाठी रेल्वेची जमीन वापरता आली, तर वांद्रे प्रकरणात अडथळा का? असा सवाल उपस्थित करत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यावर देसाई यांनी आपल्याच कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी “मंत्री खोटी माहिती देत असून सभागृहाला दिशाभूल करत आहेत. आम्ही अधिकारभंगाचा प्रस्ताव मांडू का?” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. ठाकरे गटाचे भास्कर जाधव म्हणाले, “शंभूराज देसाई शहरी विकास विभागावर बोलू शकत नाहीत. ते मुख्यमंत्री आहेत का?” असे म्हणत अध्यक्षांची परवानगी नसताना वक्तव्य का केले, असा सवाल केला.
या वादानंतर सत्ताधारी आणि ठाकरे गटातील आमदारांमध्ये वाद वाढत गेला आणि अखेर विधानसभा अध्यक्षांनी कार्यवाही दहा मिनिटांसाठी स्थगित केली. वांद्रेतील भूखंडप्रश्नी राज्यात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.


