Sanjog Waghere Resign : पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंना मोठा हादरा! शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये जाणार

•अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळख; आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून कमळ हाती घेणार
पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून, 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या मतदानापूर्वीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला शहरात मोठा खिंडार पडले आहे. पक्षाचे शहराध्यक्ष आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांनी गुरुवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. वाघेरे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून, येत्या एक-दोन दिवसांत मुंबईत त्यांचा अधिकृत प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
अजित पवारांची साथ सोडून आले होते शिवसेनेत संजोग वाघेरे हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जात. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेना (ठाकरे) गटात प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्याविरोधात कडवी झुंज दिली होती, मात्र त्यांना विजयाने हुलकावणी दिली.
नातेसंबंध आणि भाजपची रणनीती विधानसभा निवडणुकीनंतर वाघेरे पुन्हा स्वगृही (अजित पवार गटात) परततील अशी चर्चा होती. मात्र, भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्याशी असलेले त्यांचे नातेसंबंध या पक्षप्रवेशाचे मुख्य कारण ठरले आहेत. आमदार लांडगे आणि भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर वाघेरे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय पक्का केला. वाघेरे यांच्या पत्नी उषा वाघेरे या सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सक्रिय असल्या, तरी त्यादेखील आगामी काळात भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऐन निवडणुकीत गळतीमुळे ठाकरे गटाची चिंता वाढली निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. अशा महत्त्वाच्या टप्प्यावर शहराध्यक्षानेच राजीनामा दिल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.



