Sanjay Shirsat vs Madhuri Misal : सामाजिक न्याय विभागाच्या बैठकीवरून थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव; राज्यमंत्र्यांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह?
मुंबई: महायुती सरकारमधील अंतर्गत धुसफूस थांबण्याचे नाव घेत नाहीये. शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यातील सामाजिक न्याय विभागाच्या एका बैठकीवरून सुरू झालेला वाद आता थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. यामुळे सरकारमधील समन्वयाच्या अभावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
नेमका वाद काय?
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नुकतीच सामाजिक न्याय विभागाशी संबंधित एक विभागीय बैठक घेतली होती. या बैठकीवर कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मिसाळ यांना थेट पत्र पाठवले. “तुम्ही माझ्याकडील विषयावर बैठक घेतलीत, यापुढे अशा बैठका माझ्या अध्यक्षतेखालीच घेण्यात याव्यात,” असे स्पष्ट शब्दांत शिरसाट यांनी पत्रात नमूद केले होते. Sanjay Shirsat vs Madhuri Misal
यावर तात्काळ प्रत्युत्तर देताना माधुरी मिसाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मी बैठक घेण्यासाठी अधिकृतपणे पात्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्र्यांना विभागीय आढावा घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मी कुठल्याही निर्णयात ढवळाढवळ केलेली नाही. माझ्याकडे असलेल्या खात्यांशी संबंधित बैठका घेण्याचा अधिकार माझ्याकडे आहे,” असे मिसाळ यांनी म्हटले.
या वादाचे मूळ 11 मार्च 2025 रोजीच्या शासन निर्णयात दडलेले आहे. यानुसार सामाजिक न्याय विभागातील विषय मंत्री शिरसाट आणि राज्यमंत्री मिसाळ यांच्यात वाटून देण्यात आले आहेत. याच आदेशाचा आधार घेत शिरसाट यांनी मिसाळ यांच्या बैठकीच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, मिसाळ यांनी केवळ शिरसाट यांच्या पत्राला उत्तर दिले नाही, तर हा वादग्रस्त मुद्दा त्यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला आहे. आपल्या अधिकारांचा वापर करताना काही चुकीचे होत असेल, तर मुख्यमंत्री कार्यालय निर्णय देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मिसाळ यांच्या पत्रात काय?
माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, “राज्यमंत्री या नात्याने मला बैठक घेण्याचा अधिकार आहे. मी कोणताही निर्णय घेतलेला नाही, केवळ विभागाचा आढावा घेत आहे. पुढील काळातही मी या बैठका घेणार आहे.” या पत्रामुळे शिरसाट आणि मिसाळ यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे चित्र आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या वादावर काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
“महायुतीत वाद नाही” – शिरसाट
या वादावर संजय शिरसाट यांनी आपली बाजू मांडताना म्हटले की, “माधुरी मिसाळ यांना पत्र लिहिण्याचा माझा स्पष्ट उद्देश होता की काही विषय असे असतात ज्यात राज्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही, ते कॅबिनेट मंत्र्यांच्या अधिकारात येतात. मी त्यांना सूचना केली होती की तुम्हाला बैठका घ्यायच्या असतील तर मला सांगा, म्हणजे निर्णय घेण्यासाठी माझी संमती असेल. मान्यतेसाठी फाईल फिरवली जाऊ नये यासाठी मी ती सूचना केली होती. त्या चांगले काम करत आहेत. त्या काही मला आव्हान देत नाहीत. माधुरी मिसाळ यांना मी जे पत्र लिहिले, ते केवळ सहकारी म्हणून त्यांना सूचना देण्यासाठी लिहिले आहे. महायुतीमध्ये काही वाद आहे असा त्याचा अर्थ नाही. बैठका घेताना कॅबिनेट मंत्र्यांना विचारून बैठका घेत जा, असे पत्र मंत्री संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना लिहिले.” यावर मिसाळ यांनी उत्तर देताना म्हटले की, “मी मुख्यमंत्री कार्यालयाला विचारूनच बैठका घेईन.” यावरून महायुतीच्या मंत्र्यांमधील वादावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राऊतांचा मोठा दावा
या घडामोडींवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. “माधुरी मिसाळ यांना मी चांगलंच ओळखतो. त्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनुसारच बैठक घेतात. त्यामुळे त्या जर बैठक घेत असतील, तर त्यामागे मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी निश्चितच आहे. आणि जर त्यांना बैठक घ्यायला सांगितले असेल, तर याचा स्पष्ट अर्थ असा की आता संजय शिरसाट यांना आपली खुर्ची सोडण्याची वेळ येणार आहे. त्यांचा राजीनामा घेतला जाणार हेच त्याचे संकेत आहेत,” असे राऊत यांनी म्हटले आहे. यामुळे हा वाद आणखीच चिघळण्याची चिन्हे आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…