मुंबई

Sanjay Shirsat : ‘कदम यांचा आरोप बरोबरच, मी दोन दिवस मातोश्रीवर होतो!’ बाळासाहेबांच्या मृत्यूनंतरच्या वादग्रस्त घटनेला संजय शिरसाटांचा दुजोरा

•’विनायक राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच तयारी सुरू केली होती’; ‘सरण कोणी रचले’ यावर आता थेट नाव घेऊन खळबळजनक वक्तव्य.

मुंबई :- शिवसेना (शिंदे) नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दोन दिवस ‘मातोश्री’वर काय झाले? असा प्रश्न विचारून जो राजकीय वाद निर्माण केला होता, त्या वादाला आता शिंदे गटाचे आणखी एक नेते संजय शिरसाट यांनी दुजोरा दिला आहे. शिरसाट यांनी रामदास कदम यांचे विधान बरोबरच असल्याचे सांगत, त्यावेळचा एक खळबळजनक प्रसंगही उघड केला आहे.

‘मीदेखील दोन दिवस तिथेच होतो’

माध्यमांशी बोलताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना कदम यांच्या विधानाबाबत विचारणा करण्यात आली. यावर शिरसाट म्हणाले की, “मीदेखील दोन दिवस त्यावेळी मातोश्रीवरच होतो. रामदास कदम यांनी चुकीचा आरोप केलेला नाही. सत्य सर्वांनाच माहीत आहे, पण त्याचा उहापोह आम्ही कधी केला नाही.”

‘सरण कोणी रचले, नाव जाहीर करतो’

शिरसाट यांनी त्यावेळची एक धक्कादायक घटना सांगितली. ते म्हणाले की, “माझ्या माहितीप्रमाणे विनायक राऊत (माजी खासदार) यांनी दोन दिवसाआधी तयारी सुरू केली होती. त्यावेळच्या पोलीस आयुक्तांनीही याबाबत मातोश्रीला प्रश्न विचारला होता, काय झालंय आम्हाला माहिती द्या.”

त्यांनी पुढे धक्कादायक खुलासा करत म्हटले की, “बाळासाहेबांचे सरण या लोकांनी रचले होते. विनायक राऊत त्यात प्रमुख होते, हे मी नाव आज जाहीरच करतो.”

‘आम्हाला आत्म्याला दुखवायचे नाही’

या सर्व घडामोडींवर आता अधिक चर्चा करणे योग्य नाही, असे मतही शिरसाट यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, “आता झालेल्या गोष्टींची पुन्हा चर्चा करून आम्हाला बाळासाहेबांच्या आत्म्याला दुखवायचे नाही.”

बाळासाहेबांच्या निधनानंतर घडलेल्या कथित घटनांवर शिंदे गटाकडून एकापाठोपाठ एक गंभीर आरोप होत असल्याने, ठाकरे गट यावर अधिकृतपणे काय प्रतिक्रिया देतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0