Sanjay Raut : “अजितदादांच्या मृत्यूच्या संशयावरून भाजपला वेदना का?” संजय राऊतांचा थेट सवाल; फडणवीसांच्या इशाऱ्याचा घेतला समाचार

•अमोल मिटकरी, छगन भुजबळ आणि रोहित पवारांना संशय येतोय, मग मुख्यमंत्री धमकावतात का? राऊतांची तोफ धडाडली
मुंबई | माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला दहा दिवस उलटल्यानंतरही त्यातील संशयाचे धुके कमी झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आणि पवार कुटुंबातील सदस्यांनी या घटनेबाबत शंका व्यक्त केल्या आहेत. मात्र, यावरून राजकारण करू नका, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. या इशाऱ्याचा शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून, “यात तुमचा काही हात आहे का?” असा थेट सवाल विचारला आहे.
संशयाचे विविध कंगोरे
संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “अजित पवारांचे निकटवर्तीय अमोल मिटकरी, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, रोहित पवार आणि खासदार बजरंग सोनवणे या सर्वांनी या अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. जेव्हा एखादी मोठी घटना घडते, तेव्हा त्यातून विविध कंगोरे निर्माण होतात. जर त्यांच्या कुटुंबाला आणि सहकाऱ्यांना शंका येत असेल, तर त्याचं निराकरण करण्याऐवजी मुख्यमंत्री ‘याद राखा’ अशी धमकी का देत आहेत?”
पंतप्रधानांच्या सुरक्षेचा दिला दाखला
राऊत यांनी यावेळी संसदेतील वादाचा संदर्भ देत भाजपवर खोचक टीका केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत असताना त्यांच्यावर काहीतरी अघटित घडेल किंवा हत्येचा कट रचला जाईल, असा संशय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि भाजपच्या लोकांना येतो. पंतप्रधान तर ठणठणीत आहेत, तरीही तुम्हाला संशय येतो. मग आमचा एक मोठा नेता (अजित पवार) खरोखर मृत्यू पावला आहे, तर आम्हाला संशय येणे स्वाभाविक नाही का? मग तुम्हाला वेदना व्हायचे कारण काय?”
तपासाची मागणी की राजकारण?
मुख्यमंत्री वारंवार “राजकारण करू नका” असे सांगत आहेत, यावर राऊत यांनी आक्षेप घेतला. “लोकांचा या अपघातावर विश्वास बसत नाहीये. महाराष्ट्र अजूनही शोकमग्न आहे. जर लोकांनी तपासाची मागणी केली, तर त्याला राजकारण म्हणता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या अस्वस्थतेमुळे लोकांच्या मनात शंका अधिक गडद होत आहेत,” असेही राऊत यांनी नमूद केले.


