Sanjay Raut : त्या बॅगेतील कोणता माल नाशिकला पोहोचला
•शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार नेते Sanjay Raut यांचे ट्विट मुख्यमंत्री नाशिकमध्ये उतरले असता दोन संशयित बॅग आरोप
मुंबई :- शिवसेनेच्या ठाकरे गटाने नाशिक लोकसभा मतदारसंघात नुसता पैशाचा पाऊस सुरू असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या 2 तासांच्या दौऱ्यासाठी जड बॅगा आणल्या आहेत. त्यामुळे या बॅगांतून कोणता माल नाशिकला पोहोचला? असा सवाल त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी नाशिकच्या तातडीच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांच्यासोबत काही बॅगा होत्या. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर पोलिसांनी या बॅगा तातडीने उचलून नेल्या. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या बॅगांवर संशय व्यक्त करत त्यातून पैसे आणण्यात आल्याचा आरोप केला आहे. संजय राऊत आपल्या एका ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करताना म्हणाले की, मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण. नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री खाऊ घेऊन आलेतोक्षण!
नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस…दोन तासांच्या दौऱ्या साठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहातआहेत? यातून कोणतामाल नासिकला पोहचला?.. निवडणूकआयोग फालतू नाकाबंदीआणि झडत्या करत आहे.महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे.
महायुतीच्या जागावाटपात शेवटपर्यंत कळीचा मुद्दा ठरलेल्या नाशिक लोकसभेत यंदा 3 शिवसैनिकांत लढत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने येथून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने येथे राजाभाऊ वाजे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. वंचित बहुजन आघाडीने येथून करण गायकर यांना उमेदवारी दिली आहे.