Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ज्या ठिकाणी हात लावतील त्या त्या ठिकाणी माती होईल
•मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा संजय राऊत यांची मागणी
मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे सरकारवर हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे.काल झालेल्या या घटनेनंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील असणाऱ्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक बांधण्यात आलं. 4 डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. पण उद्धाटनानंतर आठ महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पूर्णाकृती पुतळा कोसळला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा
‘हात लावील तिथे सोने होते’ अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या-ज्या ठिकाणी हात लावतात त्याची माती होते, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. अयोध्यातील राम मंदिराचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले, त्यातून आता पाणी गळत आहे. नव्या संसदेचे उद्घाटन मोदींनी केले, तेथे देखील पाणी गळत आहे. अनेक पुलांचे उद्घाटन त्यांनी केले, ते पुल पडत आहेत. कोस्टल रोडचे उद्घाटन केले, तो गळत आहे. अटल सेतू मध्ये दरार पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले, तो पुतळा कोसळला आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी मोदी हात लावतात त्याची माती होत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे जबाबदार
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. मुघलांनीही महाराष्ट्रावर अनेकदा आक्रमनं केली. पण शिवरायांचा असा अपमान मुघलांनीही केला नव्हता. तो अपमान काल अवघ्या देशाने पाहिला. आग्र्यातून छत्रपती स्वाभिमानाने सुटून बाहेर आले. पण काल आपल्याच महाराष्ट्रात कोसळून पडण्याची वेळ त्यांच्यावर आली. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे जबाबदार आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी राजीनामा द्यावा ; संजय राऊत
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जवळच्या लोकांना काम दिलं. या प्रकल्पाचे ठेकेदार, शिल्पकार सगळे ठाण्यातले आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्र दु:खी आहे. त्याची भरपाई कधीच कुणी करू शकणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा. सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राऊतांनी केली.