Mumbai Crime News : दुसऱ्या लग्नाचा भयानक शेवट: गुलशन खान खूनप्रकरणी पतीला अटक!

•आत्महत्या समजलेली घटना होती थेट हत्या; रक्ताचे डाग झाले पुरावा
मुंबई | माझगावमधील 53 वर्षीय गुलशन खान यांचा मृत्यू हा अपघाती नव्हे तर सुनियोजित खून होता, हे आता स्पष्ट झाले आहे. दोन वर्षांपूर्वी आपल्या पुतण्याशी लग्न केलेल्या गुलशनचा मृत्यू 6 एप्रिल रोजी झाला होता. मात्र, तपासातील नवे खुलासे आणि न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल समोर आल्याने या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे.
गुलशन खान यांनी 2022 मध्ये आपल्या पुतण्या शोएब इम्तियाज खान उर्फ बोबडा (27 वय) याच्याशी विवाह केला होता. लग्नानंतर गुलशनने आपल्या पहिल्या पतीचे घर सोडताना तब्बल 65 तोळे सोनेही सोबत नेले होते. मात्र, लग्नानंतर तिच्यावर सासरच्यांकडून शारीरिक आणि मानसिक छळ सुरु झाला होता.
6 एप्रिल रोजी राहत्या घरातून खाली पडून मृत्यू झाल्याचे सुरुवातीला मानले गेले. पोलीसांनीही सुरुवातीला आत्महत्येची नोंद घेतली होती. पण तिच्या पहिल्या पतीने हत्येची शक्यता व्यक्त केल्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात आला.
घरातील बाथरूमच्या दारावर आणि तिच्या चप्पलांवर आढळलेले रक्ताचे डाग प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तपासाअंती गुलशनची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आग्रीपाडा पोलिसांनी तिचा पती शोएबला अटक केली.
या प्रकरणातील अन्य दोन आरोपी – शोएबचा भाऊ झैद आणि सासू रोशन खान हे सध्या फरार आहेत. त्यांच्या अटकपूर्व जामिनास देखील न्यायालयाने नकार दिला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


