Delhi Bomb Blast : लाल किल्ल्याजवळील स्फोटाला ‘आत्मघातकी हल्ल्या’चे संकेत! चार डॉक्टरांचे कनेक्शन उघड

Delhi Bomb Blast Latest News : जैश-ए-मोहम्मद, AGuH नेटवर्कचा पर्दाफाश; IED बनवणारे 2,900 किलो केमिकल जप्त; स्फोटाच्या वेळेवर गूढ कायम
ANI :- दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी 6 वाजून ५२ मिनिटांनी झालेल्या शक्तिशाली स्फोटाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. या भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. i20 कारमध्ये हा स्फोट झाला असून, घटनेच्या ३ तास आधी ही कार सुनहरी मशिदीजवळ उभी होती.
स्फोटाचा तपास करणाऱ्या दिल्ली स्पेशल सेलच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले असून, यावरून हा स्फोट आत्मघातकी दहशतवादी हल्ला असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, या दहशतवादी हल्ल्याचं कनेक्शन शिक्षण घेतलेल्या चार डॉक्टरांशी जोडले जात आहे.
दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश आणि डॉक्टर्स कनेक्शन
लाल किल्ला स्फोटाच्या आधी आणि नंतर घडलेल्या घटना, तसेच जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि अंसर गजवात-उल-हिंद (AGuH) शी संबंधित आंतरराज्यीय दहशतवादी नेटवर्कच्या पर्दाफाशातून हे डॉक्टर कनेक्शन समोर आले आहे:
1.डॉ. आदिल अहमद राठर (अनंतनाग): स्फोटाच्या आधी सोमवारी सकाळी जम्मू-काश्मीर पोलिसांनी अनंतनाग मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या डॉ. आदिल अहमद राठरला अटक केली. त्याच्या लॉकरमध्ये AK-47 रायफल सापडली असून, त्याचा संबंध जैश-ए-मोहम्मद आणि AGuH शी आहे.
2.डॉ. मुझमिल शकील (फरीदाबाद): 10 नोव्हेंबरला फरीदाबादमधून डॉ. मुझमिल शकील नावाच्या कश्मिरी डॉक्टरला अटक झाली. हा अल-फलाह युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत होता. त्याच्याकडे 360 किलो अमोनियम नायट्रेट सापडले (बॉम्ब बनवण्यासाठी याचा वापर होतो). त्याच्या दुसऱ्या ठिकाणावरून 2,563 किलो स्फोटके जप्त करण्यात आली. याचा संबंध जैशसारख्या प्रतिबंधित संघटनेशी आहे.
3.महिला डॉक्टर शाहीन शाहिद (फरीदाबाद): दुसरी अटक 7 नोव्हेंबरला हरियाणाच्या फरीदाबादमध्ये झाली. अल-फलाह युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत असलेल्या लखनऊच्या एका महिला डॉक्टर शाहीन शाहिदच्या कारमध्ये ‘कॅरोम कॉक’ नावाची असॉल्ट रायफल सापडली. तिचा या नेटवर्कमध्ये काय रोल आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.
4.डॉ. अहमद मोहियुद्दीन सैयद (गुजरात/हैदराबाद): 7 नोव्हेंबरला गुजरात एटीएसने हैदराबादचा रहिवासी असलेल्या डॉ. अहमद मोहियुद्दीन सैयदला पकडले. त्याने चीनमध्ये शिक्षण घेतले असून, चौकशीत तो रिसिन नावाचं एक खतरनाक विष बनवत असल्याचे समोर आले आहे. त्याने दिल्ली आजादपूर मंडी, अहमदाबादचे नरोडा फ्रूट मार्केट आणि लखनऊच्या आरएसएस कार्यालयासारख्या गर्दीच्या ठिकाणांची रेकी केली होती.
दिल्ली स्फोटाच्या घटनेच्या तीन तास आधी जम्मू-काश्मीर आणि फरीदाबाद पोलिसांनी संयुक्त कारवाईत 2,900 किलो IED बनवणारे केमिकल्स, शस्त्र आणि दारू गोळा जप्त केला होता. या कारवाईची वेळ आणि दिल्लीतील स्फोटाची वेळ यांचा परस्परांशी किती संबंध आहे, या दृष्टीने तपास सुरू आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) लवकरच या प्रकरणाचा तपास हाती घेणार असून, या आत्मघातकी हल्ल्यामागील संपूर्ण सूत्रधार कोण आहेत, याचा तपास आता गती घेईल.



