
Sanjay Raut On Asia Cup Match : ‘पहलगाम हल्ल्याला काही महिने झाले नाहीत, तरीही सामना खेळला’, राऊत आक्रमक
मुंबई :- आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “भारत-पाकिस्तान सामना हा फिक्सिंग होता,” असा गंभीर आरोप करत, या सामन्यानंतर तब्बल २५ हजार कोटी रुपये पाकिस्तानात गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा पैसा भारतविरोधी कारवायांसाठी वापरला जाईल, असेही राऊत यांनी म्हटले.
‘सरकारने संधी असताना माघार घेतली’
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “ज्या पाकिस्तानला कर्ज मिळू नये, यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, त्यालाच तुम्ही सामन्यातून पैसा कमावून दिला. संधी असताना भाजपने माघार घेतली. कालच्या सामन्यात दीड लाख कोटींचा जुगार खेळला गेला. सामना खेळून भारताने नाचक्की करून घेतली आहे.”
राऊत यांनी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या विधानाचाही उल्लेख केला. “संघाची इच्छा नसतानाही हा सामना खेळवण्यात आला,” असे गावस्कर यांनी म्हटले होते. यावरूनच राऊत यांनी सरकारवर दबावाचा आरोप केला.
एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका
यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केले. “एकनाथ शिंदे यांनी सर्वात आधी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावणे बंद करावे. तुम्ही शेक हँड केले नसल्याचे सांगितले जात आहे, पण तुम्ही सामना तर खेळला ना?” असा सवाल त्यांनी केला.
आक्रमक भूमिका कायम
पहलगाम हल्ल्याला काही महिने झाले नाहीत, तोवरच अशा प्रकारचा क्रिकेट सामना खेळणे चुकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. शिवसेना (उबाठा गट) ने काल राज्यभरात या सामन्याला विरोध करत आंदोलने केली. पहलगाम हल्ल्यात अनेक भारतीय सैनिकांनी प्राण गमावले असताना, अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळून संबंध सामान्य करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे, अशी भूमिका राऊत यांनी घेतली.


