
Best Election Result : शशांकराव पॅनेलने 14 जागा जिंकत सत्ता काबीज केली; भाजप-महायुतीला 7 जागांवर यश
मुंबई :- मुंबईतील प्रतिष्ठेच्या ‘दी बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’ निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) उत्कर्ष पॅनेल’ला मोठा धक्का बसला आहे. या पॅनेलला 21 जागांपैकी एकही जागा मिळाली नाही. या निवडणुकीत, फारशी चर्चा नसलेल्या ‘शशांकराव पॅनेल’ने 14 जागा जिंकून एकहाती वर्चस्व मिळवले आहे, तर महायुतीच्या ‘सहकार समृद्धी पॅनेल’ला 7 जागांवर समाधान मानावे लागले.
नऊ वर्षांची सत्ता गमावली
या निवडणुकीत ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीतील गेली नऊ वर्षांची सत्ता गमावली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या शिवसेना (उबाठा) आणि मनसे युतीसाठी हा निकाल एक मोठा धक्का मानला जात आहे.
या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनेल रिंगणात होते.
1.उत्कर्ष पॅनेल: यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होती.
2.सहकार समृद्धी पॅनेल: यात महायुतीचा भाग असलेले भाजप (प्रसाद लाड), शिवसेना (किरण पावसकर) आणि नितेश राणे यांच्या संघटना एकत्र आल्या होत्या.
3.शशांकराव पॅनेल: हे पॅनेल बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत होते.
अंतिम निकालानुसार, ‘शशांकराव पॅनेल’ने 14 जागा जिंकून बहुमत मिळवले, तर ‘सहकार समृद्धी पॅनेल’ने 7 जागा जिंकल्या.


