मुंबई

Sanjay Raut : “निवडणूक चोरली गेली!” – संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

•”लाडकी बहीणच्या आडून भाजपने विधानसभा निवडणूक हायजॅक केली”

मुंबई :- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भाजपने “चोरली, लुटली आणि दरोडा घातला” असा घणाघाती आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी भाजपवर केलेल्या आरोपाचे समर्थन करत राऊत यांनी भाजप, पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

“राहुल गांधी यांनी जे म्हटले ते आम्ही पूर्वीपासूनच सांगत होतो. ही निवडणूक हायजॅक झाली. ‘लाडकी बहीण’ या योजनेच्या आडून भाजपने निवडणूक अपहृत केली,” असा ठपका राऊतांनी ठेवला. त्यांनी असा सवालही उपस्थित केला की, “लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने विजय मिळवला, आणि सहा महिन्यांत काय घडले की भाजपला एकतर्फी विजय मिळाला?”

राऊत पुढे म्हणाले, “ते 25 जागाही जिंकू शकत नव्हते. निवडणूक आयोगासारख्या संस्थांचा गैरवापर झाला आहे. मोदी-शाह-फडणवीस या त्रिकुटाने लोकशाहीला गळा घातला आहे. खोटं बोलण्याचा नोबेल पुरस्कार दिला गेला पाहिजे, तर तो भाजपनेत्यांनाच मिळायला हवा!”

एकनाथ शिंदेंबाबतही खुलासा
संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला. “शिंदे माझे जुने मित्र होते. बंड करताना ते खूप घाबरले होते. मला म्हणाले, ‘माझं तुरुंगात जायचं वय नाही’, पण मी त्यांना म्हटलं – ‘माझंही नातवंडं आहेत, पण पक्षाच्या छातीवर पाय ठेवून जाणं म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी आहे’,” असं ते म्हणाले.

“ते डरपोक होते म्हणून गेले. आम्ही गेलो असतो, तर शिवसेना उरलीच नसती. पण आम्ही राहिलो आणि आजही बाळासाहेबांच्या विचारांवर ठाम आहोत,” असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0