Mumbra Drugs News : मुंब्रा येथे 2.38 कोटींचे ड्रग्ज जप्त, एकाला अटक!

Thane Police Busted Drug Racket : ठाणे पोलिसांची मोठी कारवाई; आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याची शक्यता
ठाणे :- ठाणे पोलिसांच्या Thane Police अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Cell) मुंब्रा बाह्यवळण परिसरात मोठी कारवाई करत सुमारे 2 कोटी 38 लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, यामागे आंतरराष्ट्रीय टोळीचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
नेमका प्रकार काय?
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, एक तरुण मुंब्रा बाह्यवळण परिसरात हायब्रीड गांजा आणि मिथिलीन डायऑक्सी मेथाम्फेटामाइन (MDMA) च्या गोळ्या विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या निर्देशानुसार अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली विरोधी पथकाने सापळा रचला.
पथकाने घटनास्थळी पोहोचून सुमित राजुराम कुमावत (वय 21) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा सापडला. पोलिसांनी जप्त केलेल्या साठ्याची अंदाजित किंमत 2 कोटी 38 लाख रुपये आहे.
अटक करण्यात आलेला सुमित मूळचा राजस्थानचा असून, तो बोरिवली परिसरात राहत होता. तो हा मोठा साठा कुणाला विकणार होता, याचा तपास पोलीस करत आहेत. या गुन्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर टोळीचा सहभाग असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांच्या नेतृत्वाखाली, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश मोरे, सोमनाथ कर्णवर-पाटील, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम, दीपक डुम्मलवाड आणि इतर कर्मचाऱ्यांनी पार पाडली. शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


