मुंबई

Sanjay Raut : ‘तुमच्या तोंडात कुणीतरी शेण कोंबलंय!’ बाळासाहेबांच्या मृत्यूच्या आरोपांवर संजय राऊत यांचा रामदास कदमांवर पलटवार

Sanjay Raut On Ramdas Kadam : ‘बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर का ठेवला? हाताचे ठसे कशासाठी?’ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचा खळबळजनक आरोप.

मुंबई :- शिवसेनेच्या दसरा मेळाव्यांच्या पार्श्वभूमीवर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात करण्यात आलेल्या एका खळबळजनक आरोपामुळे राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला आहे. शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनीही त्वेषाने पलटवार केला आहे.

रामदास कदम यांचा आरोप नेमका काय?

गोरेगाव येथील नेस्को मैदानावर झालेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी भाषणादरम्यान थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

कदम म्हणाले, “शिवसेनाप्रमुखांचं निधन कधी झालं? त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीवर ठेवला होता? याची माहिती काढा. मी खूप जबाबदारीनं मोठं विधान करत आहे. शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आजही विचारून घ्या. दोन दिवस शिवसेनाप्रमुखांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी का ठेवला होता?**”

यासोबतच, दसरा मेळावा संपल्यावर पत्रकारांशी बोलताना कदम यांनी हा मुद्दा अधिक स्पष्ट केला. ही माहिती बाळासाहेबांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली असल्याचा दावा त्यांनी केला. “बाळासाहेब ठाकरेंच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहेत. ते ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते?” असा सवाल करत, अंतर्गत काय चालले होते हे उद्धव ठाकरेंनीच स्पष्ट करावे, असे आवाहन त्यांनी केले.

संजय राऊत यांचा जोरदार पलटवार

रामदास कदम यांच्या आरोपांवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी अत्यंत कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले.

राऊत म्हणाले, “मी तिथे होतो, हे तिथे नव्हते. आम्हाला माहिती आहे. आता यांच्या तोंडात कुणीतरी शेण कोंबलं असेल भीतीपोटी आणि ते आता बोलत असतील तर काय करणार?”

ज्या शिवसेनेने आणि ज्या बाळासाहेबांनी आपल्याला मोठे केले, त्यांच्याशी अशा प्रकारचे विधान करणे म्हणजे बेईमानी आहे, अशा शब्दांत त्यांनी रामदास कदम यांच्यावर घणाघात केला. शिवसेनाप्रमुखांना जाऊन एक दशक लोटले असताना असे आरोप करणे योग्य नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

एका बाजूला दसरा मेळाव्याच्या निमित्ताने महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजवले जात असताना, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात करण्यात आलेल्या या गंभीर आरोपांमुळे महाराष्ट्राचे राजकारण नवीन वळण घेण्याची शक्यता आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

7 hours ago