Sanjay Raut : राज ठाकरे-फडणवीस भेटीवर राऊतांचा खोचक टोला; म्हणाले, ‘कदाचित गणपतीचे आमंत्रण द्यायला गेले असतील’

•‘पावसामुळे मुंबई बुडाली, पण कुणीही इतका त्रास करून घेऊ नये’; राऊतांचा भाजपवर खास चिमटा
मुंबई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या भेटीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना खास शैलीत खोचक टोला लगावला आहे.
सध्या सुरू असलेल्या गणपती उत्सवाचा संदर्भ देत संजय राऊत म्हणाले की, “कदाचित राज ठाकरे गणपतीचे आमंत्रण देण्यासाठी ‘वर्षा’ निवासस्थानी गेले असतील.” यासोबतच त्यांनी पावसामुळे मुंबईतील परिस्थितीवरही भाजपला चिमटा काढला. “फडणवीस यांच्या काळात काल मुंबई बुडाली. दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे यासारखी शहरं बुडाली आहेत. त्यामुळे कुणी इतका त्रास करून घेण्याची गरज नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.
‘राज ठाकरे परखड नेते आहेत’
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल बोलताना संजय राऊत यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. “राज्याच्या राजकारणात अनेक जण मुख्यमंत्र्यांना भेटतातच. पण त्यावर आताच चर्चा कशाला करायची. दोन मोठे नेते भेटत आहेत, एक राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तर दुसरे राज ठाकरे आहेत. त्यांच्यात बंद दाराआड काय चर्चा झाली, हे राज ठाकरेच सांगतील. ते परखड नेते आहेत,” असे म्हणत राऊत यांनी भेटीबद्दलचे अधिक बोलणे टाळले.
या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात असले तरी, राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटणे हा काही राजकीय गुन्हा नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. “उद्या आमचं काही काम असेल तर उद्धव ठाकरे यांनाही मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे. मुख्यमंत्री हा काही एका गटाचा मुख्यमंत्री नाही, तो राज्याचा मुख्यमंत्री असतो,” असे सांगत राऊत यांनी भेटीला अप्रत्यक्षपणे समर्थन दिले.


