
Sanjay Raut On Mahavikas Aghadi : संजय राऊतांनी दिले मोठे राजकीय संकेत; ‘काँग्रेस महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा घटक’ ; पुण्यातील गुंडगिरीवरून अजित पवारांवर गंभीर आरोप; ‘पुणे गुंडांचे माहेरघर झाले’
मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठा बदल घडवण्याचे संकेत मिळत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांना महाविकास आघाडीत (मविआ) काँग्रेसलाही सोबत घेण्याची इच्छा असल्याचे महत्त्वपूर्ण विधान शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी केले आहे. आज (सोमवार, 14 ऑक्टोबर) माध्यमांशी बोलताना राऊत यांनी राज ठाकरेंची ही भूमिका स्पष्ट केली.
राज ठाकरेंना काँग्रेसबद्दल काय वाटते?
राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतील संभाव्य प्रवेशाबद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरे यांची स्वतःची इच्छा आहे की, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सोबत घेणे गरजेचे आहे, ही त्यांची भूमिका आहे. प्रत्येकाचे या राज्यात एक स्थान आहे, आणि काँग्रेस हा देखील महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. काही महत्त्वाचे निर्णय घेताना शिष्टमंडळात काँग्रेसचा समावेश होणे गरजेचे आहे, ही आमची भूमिका आहे आणि तीच राज ठाकरे यांची देखील आहे.”
मनसेला मविआत घेण्याचा निर्णय दिल्लीतून होईल या काँग्रेसच्या भूमिकेवर बोलताना राऊत म्हणाले, “त्यांचे म्हणणे बरोबर आहे. दिल्लीत आमची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशीही चर्चा करतील.”
ठाणे-पुण्याच्या गुंडगिरीवरून हल्लाबोल यावेळी संजय राऊत यांनी राज्यातील गुंडगिरीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.
ठाणे महापालिकेवर निशाणा:
राऊत यांनी ठाणे महापालिकेवर ‘लुटमार करणाऱ्या हस्तकांचा भरणा’ असल्याचा आरोप केला. ठाणे महापालिकेच्या उपायुक्ताला 50 लाखांची लाच घेताना अटक झाली होती, तो उपायुक्त शिंदे गटाचा हस्तक होता, असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकप्रमाणेच ठाण्यातील गुंडगिरी मोडून काढण्याचे आदेश देणे गरजेचे आहे. त्यांनी गणेश नाईक यांनी रावणराजविरोधात आवाज उठवून जनतेचा दरबार सुरू केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
- अजित पवारांवर गंभीर आरोप: पुणे शहरात वाढलेल्या गुंडगिरीबद्दल बोलताना राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले. “पुणे एकेकाळी विद्येचे माहेरघर होते. आज पुणे अजित पवारांमुळे आणि भाजपमधील काही घटकांमुळे गुंडांचे माहेरघर झाले आहे. कोयता गँग ही संकल्पना पुण्यातून बाहेर आली. ही राज्याच्या गृहमंत्र्यांची (देवेंद्र फडणवीस) जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.



