क्राईम न्यूज

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या ‘नेपाळ’ वक्तव्यावरून राजकारण तापले; शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली

Sanjay Raut Latest News : हे वक्तव्य अराजक माजवणारे आणि पंतप्रधानांना दिलेली धमकी’; शिवसेनेचा आरोप

मुंबई :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी समाजमाध्यमावर केलेल्या ‘नेपाळसारखी’ परिस्थिती भारतातही निर्माण होऊ शकते’ या विधानावरून राजकारण चांगलेच तापले आहे. राऊत यांच्या या वक्तव्याविरोधात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आक्रमक झाली असून, आज त्यांच्या शिष्टमंडळाने थेट मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.

काय आहे आरोप?

संजय राऊत यांनी ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी, “भ्रष्टाचार करून पैसा आणि सत्ता मिळवली तर कधीतरी नेपाळ होणारच. ये डर अच्छा है!” असे म्हटले होते. या विधानाला शिवसेनेने गंभीरपणे घेतले आहे.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन राऊत यांचे हे वक्तव्य देशात अराजक माजवणारे आणि एक प्रकारे पंतप्रधानांना दिलेली धमकी असल्याचे म्हटले आहे. या चिथावणीखोर पोस्टबद्दल त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची विनंतीही शिष्टमंडळाने केली आहे.

यावेळी खासदार मिलिंद देवरा, उपनेते संजय निरुपम, सचिव संजय मोरे, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, ज्योती वाघमारे आणि इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

संजय राऊत यांनी आपल्या विधानांचे समर्थन करताना म्हटले होते की, ‘नेपाळी तरुणांनी भ्रष्ट शासनाविरुद्ध क्रांतीचा मार्ग दाखवला.’ मात्र, शिवसेनेने हे विधान अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदे गट पत्रात काय म्हणाले आहे?”

नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचाराची चित्रफित प्रसारित करून भारतातही अशा प्रकारची स्थिती येऊ शकते असे वक्तव्य करून संजय राऊत यांनी देशात अराजक माजवण्याचे मनसुबे स्पष्ट केले आहेत. त्यांनी समाजमाध्यमावर केलेली पोस्ट चिथावणीखोर तर आहेच, पण एक प्रकारे पंतप्रधानांना दिलेली धमकी आहे.

लोकशाही मार्गाने आपण राजकारणात टिकू शकत नाही याची खात्री पटल्याने आता देशात अशांतता, अराजक निर्माण करण्याचे अनेकांचे देशविरोधी मनसुबे वारंवार समोर येत आहेत. निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था, प्रशासन, प्रसारमाध्यमे या लोकशाहीच्या सर्व स्तंभांवर अविश्वास व्यक्त करून अराजक माजवण्याचे मनसुबे या पूर्वीही उघड झाले आहेत. अर्बन नक्षल प्रवृत्तीही अनेकदा डोकं वर काढण्याचे प्रयत्न करतात. राजकीय स्वार्थासाठी सुरू असलेल्या देशद्रोही कारवाया कधीही यशस्वी होणार नाहीत. देशातील जनता अशा प्रवृत्तींना थारा देणार नाही. पण त्याचवेळी अशा देशद्रोही व समाजविघातक वृत्तीकडे दुर्लक्ष करणेही योग्य नाही. हिंसाचाराचे समर्थन करून तसाच हिंसाचार भारतात घडवण्याच्या धमक्या देणाऱ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे.

त्यामुळे संजय राऊत यांच्यावर हिंसाचाराचे समर्थन करून नेपाळसारखे अराजक माजवण्याच्या धमक्या दिल्याबद्दल कारवाई करावी हि विनंती.

vivek

Recent Posts