Sanjay Raut on Trump Tariff : अमेरिकेचे भारतावर 25% आयातशुल्क; ट्रम्प यांच्या निर्णयावरून संजय राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल!

Sanjay Raut on Trump Tariff : पाकिस्तानच्या स्तुतीवरूनही राऊत आक्रमक; “मोदींना पंतप्रधानपदी राहण्याचा अधिकार उरला नाही”
ANI :- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर थेट 25 टक्के आयातशुल्क लादण्याचा घेतलेल्या निर्णयाने भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात आणि लष्करी सामग्री खरेदी करण्यावरून ट्रम्प यांनी भारतावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा वाढीव शुल्क 1 ऑगस्ट 2025 (शुक्रवार) पासून लागू होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या निर्णयावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राऊतांचा थेट पंतप्रधानांवर निशाणा
संजय राऊत यांनी ट्रम्प यांच्या निर्णयावर टीका करताना म्हटले की, “ट्रम्पने सर्वात जास्त टेरिफ भारतावर लावले आहे. 25 टक्के टेरिफ प्रिय मित्र मोदींच्या देशावर लादले आहे. आमचा भारत देश वेगळा आहे आणि भाजपवाल्यांचं मोदी राष्ट्र आहे. आम्ही भारताचा विचार करत आहोत.” रशियासोबतच्या शस्त्रास्त्रांच्या व्यवहारामुळे भारताला दंडित केले जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. “भारताला दंडित करणारा ट्रम्प आहे तरी कोण?” असा सवाल करत राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर मौन बाळगल्याबद्दल कठोर टीका केली. “मोदींचा जिवश्च, कंठश्च मित्र ट्रम्पने भारताला दंडित केले आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाची वाचा गेली आहे. जीभ लुळी पडली आहे. मोदी गायब झाले आहेत. अमित शाह, जयशंकर गायब झाले आहेत. अख्खा देश अस्वस्थ आहे,” असे ते म्हणाले.
राऊत यांनी ट्रम्प यांनी पाकिस्तानची स्तुती केल्याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली. ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या पेट्रोलियम उद्योगात सहकार्य करून त्यांना आर्थिकदृष्ट्या ताकद देण्याची भूमिका घेतल्याचे म्हटले जात आहे. यावरून राऊत यांनी, “भविष्यात पाकिस्तानकडून भारताला तेल घ्यावे लागेल अशी परिस्थिती ट्रम्प निर्माण करणार आहेत. मोदी जोपर्यंत आहेत, तोपर्यंत ट्रम्प अशी परिस्थिती निर्माण करणार आहे की पाकिस्तानकडून आम्ही तेल घ्यावे, पाकिस्तानशी आम्ही व्यापार करावा, दहशतवाद विसरून जावा.” असे म्हणत, जर डोनाल्ड ट्रम्प भारताच्या विरोधात पाकिस्तानला ताकद देत असतील, तर भारताच्या पंतप्रधानांनी याचा धिक्कार आणि निषेध करणे गरजेचे आहे, असे ठामपणे सांगितले.
गेली 60 वर्षे भारत पाकिस्तानच्या दहशतवादाशी लढत आहे, असे सांगत राऊत यांनी इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, पंडित नेहरू यांसारख्या नेत्यांचा उल्लेख केला. मात्र, सध्याच्या सरकारने यापुढे शेपूट घातल्याची टीका त्यांनी केली. “आता कुठे गेले ते अंधभक्त, सो कॉल्ड राष्ट्रभक्त, हिंदुत्ववादी, आम्हाला ज्ञान देणाऱ्या टोळ्या? नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी राहण्याचा अधिकार उरला आहे का? याचे त्यांनी आत्मचिंतन करायला हवे,” असा थेट सवाल राऊत यांनी केला.



