•“मुंबईत पैसे कमवायला आलात, ओरबडायला नाही,” दुबे यांच्या विधानावर संजय राऊत यांचा पलटवार
मुंबई :- भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि हिंदी भाषिक लोकांचे मोठे योगदान असल्याच्या केलेल्या वादग्रस्त विधानावरून राजकीय वर्तुळात नवा वाद सुरू झाला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी यावर जोरदार प्रत्युत्तर देत, दुबे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. “तुम्ही मुंबईत घाम गाळायला नव्हे, तर पैसे कमवण्यासाठी आणि तुमच्या राज्यात नोकरी-उद्योगधंदे नसल्याने मुंबईला ओरबडायला आलात,” अशा खोचक शब्दांत राऊत यांनी पलटवार केला आहे.
निशिकांत दुबे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, मुंबईच्या विकासात हिंदी भाषिकांचेही मोठे योगदान असल्याचे म्हटले होते. यावर बोलताना संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. “तुम्ही अशा व्यक्तीला जास्त महत्त्व देत आहात, जो महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या विरोधात बोलत आहे. दुर्दैवाने, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे लोक बोलत असताना त्यांचे एकप्रकारे समर्थन करत आहेत,” असे म्हणत राऊत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरही अप्रत्यक्षपणे टीका केली.
संजय राऊत यांनी, 106 हुतात्मांच्या बलिदानातून मुंबई महाराष्ट्राला मिळाली, याची आठवण करून दिली. “ते 106 हुतात्मे दुबे, चौबे, मिश्रा नव्हते, हे निशिकांत दुबे यांनी लक्षात घ्यावे. मराठी माणूस, गिरणी कामगार छातीचा कोट करून लढले, तेव्हा ही मुंबई आपल्याला मिळाली,” असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, “तुम्ही मुंबईत फक्त पैसे कमावण्यासाठी आला आहात, तुमचे पैसे तुमच्या राज्यात घेऊन जात आहात. मराठी माणसाच्या पोटावर मारून तुम्ही मुंबई लुटत आहात, हे देखील तितकेच खरे आहे. तुम्ही काही मुंबईला भव्य बनवण्यासाठी आलेला नाही.”
निशिकांत दुबे यांनी आपल्या मुलाखतीत, मुंबईच्या विकासात हिंदी भाषिकांचे योगदान असल्याचे सांगितले होते. “इंग्रजी बोलण्यावर कोणाचीही हरकत नाही, मग हिंदी बोलण्यावर का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यावरूनच, मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…