Sanjay Raut on Chandrakant Patil: उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील एकमेकांच्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवर समोर, हस्तांदोलन
मुंबई :- विधानपरिषद निवडणुकीच्या गडबडीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) एकमेकांच्या समोर आले. आपल्या जु्न्या मित्र पक्षातील नेत्याला पाहून संजय राऊत यांची कळी खुलली. त्यांनी चंद्रकांत पाटील यांचं हसून स्वागत केलं.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक होत आहे. या निमित्ताने सत्ताधारी व विरोधी बाकावरील सर्वच महत्त्वाचे नेते व आमदार विधिमंडळात पोहोचलेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही या परिसरात आले होते. ते विधानभवनाच्या पायऱ्यांवर आपल्या सहकाऱ्यांसोबत उभे असताना तिथे अचानक भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील पोहोचले. या दोन्ही नेत्यांनी यावेळी एकमेकांशी हस्तांदोलन करून संवाद साधला. त्यात राऊत यांनी आपण तर पुन्हा एकत्र आलेच पाहिजे, असे विधान करून एकच खळबळ उडवून दिली. Maharashtra Vidhan Parishad Latest Update
संजय राऊत यांनी यावेळी ‘अरे व्वा, आपण परत यायला पाहिजे,’ असं म्हणत चंद्रकांत पाटील यांच्याशी हस्तांदोलन केलं. चंद्रकांत पाटील यांनीही पुढं येत त्याचा स्विकार केला. ‘हे तुमचं वाक्य असेल तर ही लाईन होणार आहे,’ असं पाटील यावेळी म्हणाले. त्यावर मी नेहमीच लाईन देतो, असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं. दोन्ही नेत्यांच्या आजूबाजूला असलेल्या सर्वांनी हसून दाद दिली. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यानचा हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. Maharashtra Vidhan Parishad Latest Update
संजय राऊत व चंद्रकांत पाटील यांच्या या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली होती. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना स्वतः संजय राऊत यांनी आपली बाजू स्पष्ट केली. ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील आमचे जुने मित्र आहेत. दिल्लीत आम्ही पंतप्रधान मोदींना भेटतो. अमित शहाही आम्हाला भेटतात आणि हातात हात घेतात. चंद्रकांत पाटील हे राज्याचे मंत्री आहेत.
त्यांचे आणि आमचे काही वैयक्तिक भांडण आहे का? हे भांडण राजकीयदेखील नाही. आमचे भांडण वैचारिक आहे आणि ते तसेच राहील, असे संजय राऊत म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे विधिमंडळ परिसरात राजकीय विरोधकांच्या होणाऱ्या भेटीगाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ परिसरातील लिफ्टमध्ये भेट झाली होती. त्याचीही राजकीय वर्तुळात खमंग चर्चा झाली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही चॉकलेट देत उद्धव ठाकरेंशी संवाद साधला होती. त्याची खूप चर्चा झाली होती.