Sanjay Raut News : शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप
•खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या दौऱ्यावरून टीका
मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर देखील टीका केली आहे. मोदींचा दौरा आचारसंहितेचा भंग आहे असे त्यांनी म्हटले आहे.
उद्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद
महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या जागावाटपाच्या वादावर आज संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. उद्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, “उद्या गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याचं महत्त्व हे महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. अत्यंत शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. साडेतीन मुहूर्तापैकी एक. आमच्या भावना या एक दुसऱ्याशी जोडलेल्या असतात. त्यामुळे उद्याच्या शुभमुहूर्तावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि महाविकास आघाडीतले आमचे सर्व घटक पक्ष यांची संयुक्त पत्रकार परिषद उद्या शिवालय, नरीमन पॉईंट इथे 11 वाजता होईल. महाविकास आघाडीतली पुढील दिशा, झालेलं जागावाटप आणि प्रचार यंत्रणा कशी राबवली जाईल किंवा अन्य गोष्टींसंदर्भात आमचे प्रमुख नेते माहिती देतील”.
सरकारी खर्चावर निवडणुकीचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून राऊतांनी निशाणा साधला आहे. “पंतप्रधान मोदी हे सरकारी खर्चावर देशभरात फिरत आहेत. सरकारी खर्चावर ते निवडणुकीचा प्रचार करत आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे. १० वर्ष काम करूही त्यांना मतांसाठी देशभर फिरावे लागत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथदेखील महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार आहेत. मात्र, योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात येऊ नये, त्यांनी उत्तर प्रदेशात थांबायला हवं. तेथील परिस्थिती गंभीर आहे”, असे राऊत म्हणाले.