महाराष्ट्र

Sanjay Raut : रक्तदान शिबिरावरून नवा वाद: ‘गद्दाराचं रक्त सैनिकांना देऊ नका,’ राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल

•ठाकरे बंधू एकत्र आले’, राऊतांचे सूचक वक्तव्य; बाळासाहेब थोरातांच्या पराभवाबद्दल खंत

संगमनेर :- शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून श्रीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरावरून राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे. या शिबिराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संगमनेरमध्ये बोलताना राऊत यांनी “गद्दारांचं रक्त देशाच्या सैनिकांना देऊ नका,” असा घणाघाती आरोप करत शिंदे गटाला पुन्हा डिवचले आहे. असे रक्त दिल्यास देशावर मोठी आपत्ती येईल, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

याचवेळी संजय राऊत यांनी इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी बळकटी दिली. “ठाकरे बंधू एकत्र आले आहेत,” असे सूचक विधान करून त्यांनी या चर्चांना वेगळ्या दिशेने नेले.

याशिवाय, त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील पराभवाबद्दल खंत व्यक्त केली. “बाळासाहेब थोरात यांनी तुमच्यासाठी शाळा, पाणी दिले, पण तुम्ही त्यांना विधानसभेत पाठवले नाही,” असे म्हणत त्यांनी मतदारांना आठवण करून दिली. तसेच, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कोविड काळात उत्कृष्ट काम केले होते, मात्र हे सरकार खोटेपणाने पाडण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

राज्यातील काही महापालिकांनी मासंहार बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयावरही राऊत यांनी टीका केली. “जर असा निर्णय घेतला असेल, तर तो का घेतला हे आधी लोकांना पटवून द्या,” असे सांगत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले. यातून, भाजप-शिंदे-राष्ट्रवादी युती सरकारवर त्यांनी अनेक मुद्द्यांवरून टीकेची झोड उठवल्याचे दिसून आले.

vivek

Recent Posts