Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे
•लोकसभेच्या पराभवानंतर लाडकी बहीण योजना आली, त्या पहिले केवळ लाडके आमदार, Sanjay Raut
मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये राज्यात कोणत्याही परिस्थितीत सत्तांतर होईल असे वातावरण सध्या राज्यात निर्माण झाले आहे. संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकसभेच्या पराभवाच्या नंतर लाडकी बहीण आणली परंतु त्याच्या पहिले केवळ लाडका खासदार आमदार आणि नगरसेवक होते असा टोलाही संजय राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, बहिणीविरोधात बायकोला उभे केले, जनतेला कळाले ते अजितदादांना कळाले नाही. शरद पवार यांना सोडल्यापासून अजित पवारांची अधोगती सुरू झाली आहे, एजन्सी सांगतिल ते अजित पवार करत आहे असेही राऊत यांनी म्हटले आहे.संजय राऊत म्हणाले की, 1500 रुपयांत मुख्यमंत्री व त्यांच्या टोळय़ांनी घरची चूल पेटवून दाखवावी. पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना पाच कोटी, पदाधिकाऱ्यांना किमान दोन कोटी, आमदार-खासदारांना 50 ते 100 कोटी हे दरपत्रक असताना राज्यातील असहाय्य लाडक्या बहिणींना 1500 रुपये हा कुठला न्याय? त्यामुळे राज्यातील भगिनींनी सध्या हे 1500 रुपये जरूर घ्यावेत, मात्र राज्यात मविआ सरकार येताच या 1500 मध्ये भरघोस वाढ होईल याची खात्री बाळगा असे त्यांनी म्हटले आहे. निवडणुका वेळेत घ्याव्याच लागणार आहे, त्यामुळे नोव्हेंबरमध्ये राज्यात नवे सरकार येईल, त्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मजबूतीने कामं करत आहेत. जागा वाटप सुरळित पार पडेल.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात कुणी सावत्र भाऊ नाही, नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी जेवढे महाराष्ट्राचे नुकसान केले तेवढे कुणीच केले नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री दिल्लीचे पोपट म्हणून बोलत आहे, सत्ता गेल्यानंतर दिल्ली त्यांच्याकडे पाहणार देखील नाही.
महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर असताना सत्ताधाऱ्यांनी निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून लाडकी बहीणसारख्या योजना जाहीर केल्या. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने सरकारला लाडक्या बहिणींची आठवण झाली. खरे तर मिंधे सरकारच्या काळात अनेक लाडक्या बहिणींवर अन्याय व अत्याचार झाले, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.