मुंबई

“तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा Sanjay Raut: निष्ठावान मुसलमान परवडला!”; परभणीच्या महापौरावरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात; “भाजपचे 12 नगरसेवक मुस्लिम नाहीत का?”

Sanjay Raut On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी अभ्यासासाठी डोक्याला तेल लावावे; “उचलली जीभ आणि लावली दाढीला” म्हणत राऊतांचा टोला; परभणीतील मुस्लिम महापौरावरून राजकारण तापलं

मुंबई :- परभणीत शिवसेनेने मुस्लिम महापौर देऊन आपला ‘खरा चेहरा’ दाखवला, या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या Eknath Shinde विधानावर संजय राऊत Sanjay Raut यांनी आज आगपाखड केली. राऊत म्हणाले की, ज्यांनी ज्या ताटात खाल्लं तिथेच तंगडी वर करणाऱ्या बेईमान गद्दारांपेक्षा पक्षासाठी वर्षानुवर्षे रक्त आटवणारा आमचा निष्ठावान शिवसैनिक आम्हाला लाख पटीने श्रेष्ठ आहे. परभणीचे नवनियुक्त महापौर हे केवळ मुस्लिम चेहरा नसून ते शिवसेनेचे जुने आणि लढवय्ये तालुकाप्रमुख आहेत. अशा निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय दिला तर गद्दारांच्या पोटात दुखणं स्वाभाविक आहे, असा टोला त्यांनी लगावला.

एकनाथ शिंदेंना इतिहासाचे आणि वर्तमानाचे भान नसल्याची टीका करताना राऊत यांनी त्यांना अभ्यासासाठी चक्क ‘डोक्याला तेल’ लावण्याचा सल्ला दिला. “उचलली जीभ आणि लावली दाढीला… असा हा प्रकार आहे. शिंदेंना हे माहीत आहे का की परभणीत खुद्द भारतीय जनता पक्षाचे 12 नगरसेवक हे मुसलमान आहेत? जर तिथे भाजपला संधी मिळाली असती, तर त्यांनीही त्याच 12 पैकी एकाला महापौर केलं असतं,” असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला. या देशात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यापासून ते अनेक सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांपर्यंत मुस्लिम व्यक्तींनी सर्वोच्च पदे भूषवली आहेत, याचे भान उपमुख्यमंत्र्यांनी ठेवावे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रातील मराठी भाषिक मुस्लिम हे या मातीतील असून ते काही घुसखोर नाहीत, असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं. आमचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुस्लिम असून ते निष्ठेने भगवा झेंडा हातात घेऊन काम करत आहेत. मग कार्यकर्ता मुसलमान आहे म्हणून त्याला पदापासून दूर ठेवायचे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “हिंदू-मुसलमान वाद निर्माण करून राजकारण करण्यापलीकडे या सरकारकडे दुसरा कोणताही कार्यक्रम नाही,” अशा शब्दांत राऊत यांनी शिंदे सरकारचा आणि भाजपचा समाचार घेतला.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago