Mumbai News : IIT बॉम्बेमध्ये घुसखोरीचा धक्कादायक प्रकार! बिलाल अहमद तेली दुसऱ्यांदा सापडला, सुरक्षा यंत्रणाबाबत सवाल

•14 दिवस IIT कॅम्पसमध्ये लपून राहिला; यापूर्वीही एका महिन्यापर्यंत लपून घेतल्याची कबुली
मुंबई | मुंबईतील IIT बॉम्बे संस्थेच्या कॅम्पसमध्ये 14 दिवसांपर्यंत लपून राहिलेल्या 22 वर्षीय बिलाल अहमद तेली या युवकामुळे देशभरातील सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबई पोलीस, क्राईम ब्रँच, महाराष्ट्र ATS आणि इंटेलिजन्स ब्युरो (IB) अशा अनेक यंत्रणा त्याच्याकडून चौकशी करत आहेत. चौकशीत त्याने धक्कादायक कबुली दिली आहे की तो याआधीही गेल्या वर्षी जवळपास महिनाभर IIT बॉम्बेमध्ये लपून राहिला होता.
बिलालने सांगितले की, त्याला तंत्रज्ञानात रस असून त्यासाठी काही लेक्चर्समध्ये तो सहभागीही झाला होता. त्याने 12वी नंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा सहा महिन्यांचा कोर्स केला होता. पोलिसांना तपासादरम्यान त्याच्या मोबाईलमध्ये IMO व अन्य अॅप्ससह, कॅम्पसचे व्हिडीओ आढळले असून हे व्हिडीओ तो सोशल मीडियावर टाकण्याच्या तयारीत होता.
4 जून रोजी संशयित व्यक्तीच्या हालचालीवरून सुरुवात झालेल्या या प्रकरणात, CCTV फुटेजच्या आधारे त्याची ओळख पटवण्यात आली आणि 17 जून रोजी लेक्चर हॉलमधून त्याला ताब्यात घेण्यात आले. यानंतर त्याने कॅम्पसच्या वेगवेगळ्या हॉस्टेलमध्ये 2 जून ते 7 जून आणि 10 ते 17 जून दरम्यान वास्तव्य केल्याचे मान्य केले.
पवई पोलिसांनी त्याच्याविरोधात BNSच्या कलम 329(3) आणि 329(4) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून सद्यस्थितीत त्याची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे.


