मुंबई

Sanjay Raut : ‘या लोकांना सोबत घेऊन काम करणे अवघड आहे’, फडणवीसांनी अमित शहांना सांगितले; राऊतांचा मोठा दावा

•’मंत्र्यांचे खातेबदल ही थातूरमातूर कारवाई’; कलंकित सरकारमधील मंत्र्यांना जावेच लागेल, संजय राऊत यांचा इशारा

मुंबई :- विधिमंडळात ‘रमी’ प्रकरणानंतर माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा खाते देण्यात आले आहे. या राजकीय घडामोडींवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसंदर्भात एक मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी या भेटीत फडणवीस यांनी आपल्याच मंत्र्यांबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे म्हटले आहे.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “हे सरकार कलंकित झाले आहे. मी खात्रीने सांगतो की यातील काही मंत्र्यांना जावे लागेल.” फडणवीस-शाह यांच्या भेटीबाबत माहिती आल्याचा दावा करत राऊत म्हणाले, “या भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांना सांगितले आहे की, अशा लोकांबरोबर मला काम करणे अवघड झाले आहे. सरकारची आणि राज्याची बदनामी होत आहे.”

राऊत यांनी वसईच्या आयुक्तांवर पडलेल्या धाडीचा संदर्भ देत, हे एक हजार कोटींचे प्रकरण असून, यात एका मंत्र्याला जावेच लागेल असा दावा केला. “मंत्र्यांचा खातेबदल ही थातूरमातूर कारवाई आहे,” असे सांगत, “आरोपी मंत्री आणि त्यांचे बॉस आपल्या माणसांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जनता, सामाजिक कार्यकर्ते यावर काहीही फरक पडणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

राऊत पुढे म्हणाले की, “या मंत्र्यांना जावे लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला. तसेच, दिल्लीने अजित पवार यांना न सांगता भुजबळ यांना मंत्री केले,” असेही त्यांनी सांगितले. संजय राऊत यांच्या या आरोपांमुळे महायुती सरकारमधील अंतर्गत धुसफुस पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0