
Sanjay Raut On Eknath Shinde : ठाण्यातील ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवरून राऊत आक्रमक; निवडणूक आयोगालाही लगावला टोला
मुंबई | ठाण्यातील मनसे उमेदवाराबाबत समोर आलेल्या खळबळजनक व्हिडिओवरून राज्याचे राजकारण तापले आहे. या प्रकरणावरून खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. पोलीस यंत्रणेचा वापर करून उमेदवारांना पळवून थेट मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर नेणे, हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
पोलीस यंत्रणेचा गैरवापर
मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या पुराव्यांचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, “पोलीस उमेदवारांच्या घरात घुसतात, त्यांना गाडीत टाकून ठाण्यातील निवासस्थानी (आनंद आश्रम/बंगला) नेतात. हे काम करण्यासाठी पोलिसांवर नक्कीच वरून दबाव आहे. सत्ताधाऱ्यांना आता मशाल आणि इंजिनची इतकी भीती वाटू लागली आहे की, समोरच्या उमेदवाराने निवडणूक लढवूच नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत.”
निवडणूक आयोगावर अविश्वास
या प्रकरणात निवडणूक आयोग काही करेल, अशी आशा बाळगणे व्यर्थ असल्याचे राऊत यांनी नमूद केले. “आयोग फक्त अहवाल मागेल आणि वेळकाढूपणा करेल. त्यामुळे आता या अन्यायाविरुद्ध थेट न्यायालयात जाणेच योग्य आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. पैसे वाटून किंवा उमेदवार पळवून मतदारांचे मन वळवता येणार नाही, जनतेच्या मनात या राजकारणाबद्दल प्रचंड चीड असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
बाळासाहेबांच्या पुतळ्यावरून ‘मूर्ख’ शब्दांत टीका
निवडणूक आयोगाने मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा झाकल्याच्या कारवाईवरही राऊत यांनी संताप व्यक्त केला. “निवडणूक आयोग मूर्ख आहे. बाळासाहेब हे राष्ट्रपुरुष आहेत. मग मुंबईतील अटलबिहारी वाजपेयींचे पुतळे का झाकले नाहीत? शिंदे आणि फडणवीस यांच्या मनात बाळासाहेबांची भीती आहे, म्हणूनच असे कृत्य केले जात आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
“तुम्ही आम्हाला घाबरला आहात”
संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटा काढताना म्हटले की, तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरले, तरी आम्ही पाय रोवून उभे आहोत. आता तुम्ही उमेदवार चोरून जिंकू पाहत आहात, यावरूनच तुम्ही आम्हाला किती घाबरला आहात हे सिद्ध होते. या गलिच्छ राजकारणाचे उत्तर जनता मतपेटीतून नक्कीच देईल.


