
Sanjay Raut On Manoj Jarange Patil : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भूमिकेचे कौतुक, शिंदे-पवारांच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह
मुंबई :- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी यावर प्रतिक्रिया देताना, जर जरांगे आणि मराठा समाज समाधानी असेल, तर आम्हीही समाधानी आहोत, असे म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी भाजपवर टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाचे कौतुक केले आहे.
‘मराठा समाजाच्या वेदना सरकारने संपवल्या तर अभिनंदन’
संजय राऊत म्हणाले की, “मुंबईत मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा बांधवांनी जे आंदोलन केले, ते पावसात आणि चिखलात होते. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. जर आंदोलक आणि मनोज जरांगे समाधानी असतील, तर आम्हीही समाधानी आहोत. त्यांच्या वेदना आणि क्लेश सरकारने संपवले असतील, तर आम्ही सरकारचे अभिनंदन करू.”
यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या भूमिकेचे समर्थन केले. “भुजबळ म्हणाले ते योग्य आहे की, पूर्ण अध्यादेश हाती येत नाही तोपर्यंत कोणीही आकांडतांडव करू नये. ओबीसी असो की मराठा, सगळे महाराष्ट्रातलेच बांधव आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे म्हणणे होते की, मराठी माणसाची एकजूट असली पाहिजे. आम्ही त्याच विचारांवर चालणारे आहोत.”
‘भाजप दुतोंड्या गांडुळासारखा पक्ष’
राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “भाजपचे काही नेते अजूनही मनोज जरांगे यांची कुचेष्टा करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की आम्ही कसे जरांगे यांना बाहेर काढले. भाजप हा दुतोंड्या गांडुळासारखा पक्ष आहे.” जरांगे मुंबईत आल्यावर भाजपच्या काही लोकांनी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला.
मात्र, याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे कौतुक केले. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिस्थितीत संयम दाखवला, त्यामुळे मी त्यांचे कौतुक करतो.” पण त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आंदोलनातील अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “कालच्या आंदोलनात एकनाथ शिंदे आणि अजित पवार कुठे होते?” असा सवाल राऊत यांनी केला.
राऊत म्हणाले की, सरकारने जीआर काढला कारण त्यांच्यापुढे पर्याय नव्हता. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आंदोलनाची कोंडी फुटणे आवश्यक होते, त्यामुळेच हा जीआर काढला गेला.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची, हैदराबाद गॅझेटची मागणी आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे, जरांगे पाटील यांनी पाच दिवसांचे उपोषण मागे घेतले आहे.


