मुंबई

Sanjay Raut : “फडणवीस शेवटचा घाव ‘मिंध्यांवरच’ घालतील, तर मुंबईत महापौर ठाकरे बंधूंचाच होईल!”; संजय राऊतांची तोफ डागली

Sanjay Raut On Mahayuti : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावरुन सरकारवर टीका; धनंजय मुंडेंच्या दिल्ली भेटीवरही राऊतांचे सडेतोड भाष्य

मुंबई | शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील ‘माणिक-मोती’ गळायला सुरुवात झाली आहे, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी महायुतीवर जोरदार हल्ला चढवला आहे. “देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्याने गेम करत असून, त्यांचा शेवटचा घाव हा मिंध्यांवरच (शिंदे गट) असेल,” असा सूचक इशारा देत राऊतांनी राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

“भ्रष्टाचाऱ्यांनी आमच्याकडे या, हाच सरकारचा संदेश” क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, “कोकाटे यांना वाचवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत झाला. यातून सरकारने एकच संदेश दिला आहे की, आम्ही भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. ज्या आमदारांवर किंवा मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांनी खुशाल आमच्या पक्षात यावे, त्यांना पूर्ण संरक्षण मिळेल. अमित शाह आणि धनंजय मुंडे यांची भेट हा देखील याच मालिकेतील एक भाग आहे.”

धनंजय मुंडेंच्या भेटीवर टोलेबाजी “वाल्मिक कराड अजूनही तुरुंगात आहेत आणि खटला सुरू आहे. अशा परिस्थितीत गंभीर आरोप असलेल्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे पाप फडणवीस करतील असे मला वाटत नाही,” असे राऊत म्हणाले. भ्रष्टाचारी मंत्र्यांमुळे या सरकारला काळीमा लागली असून, शिंदे गटाच्या अशा अनेक मंत्र्यांना तातडीने बरखास्त करण्याची गरज असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

ठाकरे बंधू आणि मुंबईचा महापौर मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत राऊत यांनी अत्यंत मोठे विधान केले आहे. “मुंबईचा आगामी महापौर हा ठाकरे बंधूंचाच (राज आणि उद्धव ठाकरे) असेल आणि तो अस्सल मराठी माणूसच असेल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू असून आज आपण शरद पवार यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसकडूनही सकारात्मक संदेश आल्याचे सांगत त्यांनी महाविकास आघाडी अधिक मजबूत असल्याचे संकेत दिले.

अजित पवार भाजपचे ‘हस्तक’ पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर राऊतांनी नाराजी व्यक्त केली. “अजित पवारांशी युती करणे म्हणजे भाजपशी हातमिळवणी करण्यासारखे आहे. अजित पवार हे भाजपचे हस्तक म्हणून काम करत आहेत,” असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.

vivek

Recent Posts